डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ पाटकर रस्त्यावरील स्कायवाॅकखाली भरधाव वेगातील एका रिक्षाची धडक बसून दुचाकीवरील पोलीस गंभीररीत्या जखमी झाला. डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत. गोपाळ गोरखनाथ मांडवे (४४) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मांडवे हे मुंबई पोलीस आयुक्तालयातील भांडुप पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत.
२७ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मांडवे डोंबिवली पूर्व भागातील स्टार काॅलनी भागात एका गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहतात. ते दररोज सकाळी दुचाकीने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात येऊन प्रस्तावित वाहनतळावर आपली दुचाकी उभी करतात. गेल्या आठवड्यात रात्री साडे दहा वाजता मांडवे डोंबिवली स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावरील स्कायवाॅक खालील रस्त्याने इंदिरा चौकाकडे दुचाकीवरून जात असताना समोरून भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली.
त्यात ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. काही नागरिकांनी मिळून त्यांना रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर रिक्षा चालकाने मदत न करता तेथून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. मांडवे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून डोळ्याला मार लागला आहे. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आल्याचे मांडवे यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळेत डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात रिक्षा चालकांची धावपळ असते. अनेक बेकायदा पद्धतीने रिक्षा चालवणाऱ्यांची संख्या शहरात अधिक आहे. त्यामुळे ते पादचाऱ्यांच्या सुरक्षेची कदर न करता प्रवासी वाहतुकीच्या अधिक फेऱ्या होतील, यासाठी भरधाव वेगात रिक्षा चालवत असतात, असे प्रवाशांनी सांगितले. रात्रीच्या वेळेत काही रिक्षा चालक मद्यसेवन करतात. त्यामधुनही असे प्रकार होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
