डोंबिवली : गणेशोत्सवापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डेभरणी, रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशावरून रस्ते ठेकेदारांनी डोंबिवलीत खड्डेभरणीची पद्धत अतिशय निकृष्ट आहे. अशी रीतीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत, शिवाय अशा कामाचे एकही देयक मंजूर केले जाणार नाही, असा इशारा भाजपचे नगरसेवक व उपमहापौर राहुल दामले यांनी ठेकेदारांना दिला.
डोंबिवली शहराच्या विविध भागांत ठेकेदारांनी नादुरुस्त, खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू केले आहे. या रस्त्यांवर ठेकेदारांकडून खडी, डांबर मिश्रणाचा तयार गिलावा आणून टाकला जात आहे. लहान खड्डा असेल तर त्यात खडी, डांबर मिश्रणाची गोणी ओतली जात आहे. रस्त्याची लांबी अधिक असेल तर त्यावर डम्परमधून गिलावा ओतून रोलर फिरवला जात आहे.
बुधवारपासून आपल्या प्रभागात व शहराच्या विविध भागांत फिरत असताना उपमहापौर राहुल दामले यांना पालिकेच्या ठेकेदारांकडून खड्डे व रस्ते सुस्थितीत करण्याची कामे अतिशय निकृष्ट पद्धतीने सुूरू असल्याचा संशय आला. त्यांनी आपले वाहन गुरूवारी सकाळी टिळक रस्त्यावरील डांबरीकरण केलेल्या भागात थांबवले. त्यांनी रस्त्यावर उतरून डांबरीकरण तपासून पाहिले. त्यावेळी खडी, डांबरीचा गिलावा सहजपणे उखडला गेला. त्यांनी हाताने रस्त्यावरील गिलावा काढण्याचा प्रयत्न केला. तो गिलावाही सहजपणे हातात आला.
गणेशोत्सवापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डेभरणी, रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशावरून रस्ते ठेकेदारांनी डोंबिवलीत खड्डेभरणीची पद्धत अतिशय निकृष्ट आहे. अशा रीतीची कामे खपवून घेतली जाणार नाहीत, शिवाय अशा कामाचे… pic.twitter.com/RGL3DuN49F
— LoksattaLive (@LoksattaLive) September 3, 2026
अधिकाऱ्यांची कानउघाडणी
निकृष्ट रस्ते दुरुस्ती कामाचे देयक पालिका या ठेकेदारांना देणार असल्याचे समजल्यावर उपमहापौर राहुल दामले यांनी टिळक रस्त्यावर आपले वाहन थांबवले. त्यांनी निकृष्ट काम झालेल्या ठिकाणी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांना तात्काळ पाचारण केले. तेथे तातडीने भाजप डोंबिवली पू्र्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर आले. दामले, पेणकर यांनी डांबरीकरण झालेल्या रस्त्याची पाहणी केली. डांबरीकरण व खड्डे भरणी ठेकेदाराने अतिशय निकष्ट पद्धतीने केल्याचे पाहणी त्यांच्या निदर्शनास आले. अशी निकृष्ट कामे आपण का खपवून घेतो. याच कामांचे पूर्ण देयक ठेकेदार घेणार आहे, असे उपमहापौर दामले यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
शहर अभियंता अनिता परदेशी यांना संपर्क करून उपमहापौर दामले यांनी डोंबिवलीत सुरू असलेल्या डांबरीकरण व खड्डे भरणी कामाची माहिती दिली. अशी कामे अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत. अशा डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरून वाहने सतत धावणार आहेत. त्यामुळे गणपतींचे आगमन होईपर्यंत या रस्त्यांवर खड्डे पडलेले असतील, अशी माहिती दामले यांनी अधिकाऱ्यांना दिली. ही कामे तातडीने थांबवून दर्जेदार रस्ते सुस्थितीतकरणाची कामे होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना केल्या. शहर अभियंता परदेशी, कार्यकारी अभियंता सांगळे यांनी शहरातील डांबरीकरणाची कामे मजबूत सुस्थितीत होतील याकडे लक्ष दिले जाईल, असे आश्वासन उपमहापौर दामले यांना दिले.
पाऊस पडला
कार्यकारी अभियंता सांगळे यांनी टिळकनगर परिसरातील रस्त्यांवर निकृष्ट डांबरीकरण, खड्डेभरणी का केली, असा प्रश्न ठेकेदाराला विचारल्यानंतर त्याने, कामाच्या वेळी पाऊस सुरू असल्याने तसे काम दिसते, असे स्पष्टीकरण दिले. त्यावर पाऊस सुरू असताना काम बंद ठेवले जाते हे तुम्हाला कळत नाही का, या सांगळेंच्या प्रश्नावर ठेकेदार निरुत्तर झाला.
शहरातून फिरताना रस्ते सुस्थितीकरणाची कामे डांबर मिश्रित खडी टाकून केली जात असल्याचे दिसून येत होते. रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष पाहणी केल्यावर ही कामे निकृष्ट पद्धतीने केली असल्याचे लक्षात आले. कामे तात्काळ थांबवून ती योग्य रीतीने केली जातील, यासाठी शहर अभियंंता विभागाला सूचना केल्या आहेत. -राहुल दामले, उपमहापौर.
