डोंबिवली – उन्हाच्या काहीलीने नागरिक हैराण आहेत. घरातील पंखे, वातानुकूलित यंत्रणा महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाल्यावर घरात बसणे अशक्य होते. अशा परिस्थितीत मागील दोन दिवसांपासून डोंबिवलीत पश्चिमेत गरीबाचापाडा फिडरवरील विद्युत पुरवठा देखभाल दुरुस्ती, विजेचा खांब बदलणे अशा कारणांसाठी दुपारच्या वेळेत बंद करण्यात येत असल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

महावितरणच्या अभियंता, कर्मचाऱ्यांनी ही कामे सकाळच्या वेळेत करून घेण्याऐवजी नागरिक घरात दुपारच्या वेळेत आराम करत असताना महावितरणचे कर्मचारी दुपारच्या वेळेत वीज पुरवठा खंडित करतात. या प्रकाराने रहिवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शुक्रवारी दुपारी देवीचापाडा, गरीबाचापाडा भागात महावितरणने देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहील असे जाहीर केले होते. हा वीज पुरवठा सर्व कामे करून झाल्यावर चार वाजता पूर्ववत झाला. पूर्वसूचना देऊन हे काम करण्यात आले.

शनिवारी दुपारी दोन वाजता अचानक देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. रस्त्याने चालताना उष्णतेने शरीर भाजून निघत आहे. काहिलीमुळे घरात बसणे अशक्य होत आहे. अशापरिस्थितीत नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विचार न करता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. मागील तीन ते चार महिन्यात असे प्रकार घडत नव्हते. आता कडक उन्हाळा सुरू झाल्यावर वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. घरगुती पध्दतीने वीजेवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे यामध्ये आर्थिक नुकसान होते. घरातून कार्यालयीन काम करणाऱ्या कार्पोरेट कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.

येणाऱ्या पावसाळयाचा विचार करून नागरिक तिखट कुटणाऱ्या विद्युत चक्क्यासमोर रांगा लावून बसलेले असतात. वीज पुरवठा खंडित झाला की चक्की चालकाचा नाईलाज होतो. आणि ग्राहकांना ताटकळत बसण्याशिवाय पर्याय राहत नाही. काही लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागातील विजविषयक कामे झटपट करा म्हणून महावितरण अभियंत्यांवर दबाव आणतात. त्यामुळेही अभियंत्यांना काही कामे हाती घ्यावी लागतात, अशी माहिती आहे. त्यामुळे इच्छा नसुनही अभियंते वीज पुरवठा खंडित करून नगरसेवकामनी सुचवलेले कामे करत आहेत.

शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून चार तास वीज पुरवठा खंडित होता. शनिवारी दुपारी दोन वाजले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला. या सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आपण महावितरणच्या अभियंत्यांना रस्त्यावरील विजेचे खांब, तुटलेल्या तारा, मिनी पीलरमधील बिघाड याविषयी काही सूचना केल्या की त्याची दखल हे अभियंते वेळेवर घेत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशाप्रकारे वीज पुरवठा सतत खंडित होण्याचे प्रकार वाढतात, असे उमेशनगरमधील रहिवासी आणि गजानन महाराज भक्त मंदिर पुजारी राजू जोशी यांनी सांगितले.