डोंबिवली – मुंबई विद्यापीठ अंतर्गत ठाणे विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयाच्या आयोजनाखाली आंतर महाविद्यालयीन योगासना स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रगती बँक्वेट सभागृहात पार पडली. या स्पर्धेत उल्हासनगर, डोंबिवलीतील महाविद्यालयांनी बाजी मारली. ठाणे जिल्हा परिसरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रगती महाविद्यालयाच्या माजी खेळाडू आणि योग मार्गदर्शक प्रसाद मामूनकर यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रसाद मामूनकर तसेच ठाणे क्रीडा समितीचे सचिव गणेश मोरे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष बागराव यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय वानखडे यांच्या हस्ते करण्यात आला.

उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना प्रसाद मामूनकर यांनी सांगितले, खेळामध्ये सातत्य, चिकाटी आणि ध्येय निश्चित करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपण एकाग्रता करून योगा केला असता निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल. त्यामुळे दिवसभरात वेळात वेळ काढुन योग करणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीर सृदृढ राहण्यास खूप मदत होते.

प्राचार्य डॉ. वानखडे सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व विशद केले, या स्पर्धेचे तांत्रिक बाजू मुख्य पंच राजेश पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ठाणे जिल्हा योग संघटनेच्यावतीने पाहिले, तसेच कार्यक्रमाकरिता डॉ .राहुल अकुल, के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य उदय नाईक, गोपाळ सूर्यवंशी, डॉ. मनोज मकवाना, यतीन केणे, निवड चाचणीचे काम ठाणे विभाग क्रीडा समिती सदस्य डॉ.बागराव, पुष्कर पवार यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक प्रगती महाविद्यालयाचे क्रीडा संचालक लक्ष्मण इंगळे यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

मुलांचा सांघिक गट – प्रथम क्रमांक: एस.एस.टी. महाविद्यालय, उल्हासनगर, द्वितीय क्रमांक: बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण, तृतीय क्रमांक: के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली, मुलींचा सांघिक गट – प्रथम क्रमांक: एस.आय.ए. महाविद्यालय, डोंबिवली, द्वितीय क्रमांक: बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण, तृतीय क्रमांक: के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली.

वैयक्तिक गट – मुली – प्रथम: सानिका गायकर – एस.आय.ए. महाविद्यालय, डोंबिवली, द्वितीय क्रमांक साक्षी अवारे – एस.आय.ए. महाविद्यालय, डोंबिवली, तृतीय: सदासुखी मकाड – एस.आय.ए. महाविद्यालय, डोंबिवली. या गटात एस.आय.ए. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तिन्ही क्रमांक पटकावून बाजी मारली.

वैयक्तिक गट – मुले – प्रथम क्रमांक- निबोध पाटील – एस.एस.टी. महाविद्यालय उल्हासनगर, द्वितीय: पार्थ कदम – एस.एस.टी. महाविद्यालय उल्हासनगर, तृतीय: विकास तरे – एस.एस.टी. महाविद्यालय उल्हासनगर. या गटात एस.एस.टी. महाविद्यालयाने तिन्ही क्रमांकांवर वर्चस्व गाजवले.