कल्याण – डोंबिवली पूर्वेतील पी ॲन्ड टी काॅलनी परिसरात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालयावर मोर्चा काढून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. महिनाभरापासून पाणी येत नसल्याने पालिका, खासगी टँकरचे पाणी विकत घेऊन आम्हाला पाण्याची गरज भागवावी लागत आहे, अशा तक्रारी मोर्चेकरांनी केल्या.
पी ॲन्डी टी काॅलनी भागातील संजयनगर, गणेशनगर भागात चाळी, इमारती आहेत. नवीन इमारतींची कामे या भागात सुरू आहेत. रुग्णालये, काही वाणिज्य संस्था या भागात आहेत. या सर्व संस्थांना पुरेशा दाबाने पाणी येत मात्र या भागातील रहिवाशांच्या घरात पिण्यासाठी पुरेल इतके पाणी येत नाही. पालिका, एमआयडीसीचे अधिकारी या पाणी टंचाईच्या विषयाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी सांगितले. या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका अधिकारी इकडचे पाणी तिकडे आणि तिकडचे पाणी इकडे वळवून लोकांची दिशाभूल करतात, असा आरोप राणे यांनी केला.
पी ॲन्ड टी काॅलनी परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तीन वर्षापूर्वी सागाव पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे विशेष पाणी पुरवठ्याची योजना राबविण्यात आली. पण हे पाणी आता वस्तीला पुरेशा दाबाने येत नाही. या ठिकाणाहून पालिकेचे टँकर पाणी भरून शहराच्या भागात विक्रीसाठी नेतात. पालिकेला पाणी विक्रीसाठी पाणी आहे. रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी नाही. पालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे, असे राणे यांनी सांगितले.
नोकरदार महिला हाल
घरात गेल्या महिन्यापासून पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याने नोकरदार महिलांचे सर्वाधिक हाल होत आहेत. शाळकरी मुले, नोकरदार वर्गाला घरातून वेळेत बाहेर आवश्यक असते. घरात पाणी नसल्याने मोठी अडचण होत आहे. सोसायटीला पाणी येण्यासाठी काही नोकरदार मंडळी कार्यालयात सुट्टी घेऊन विकतचे पाणी मिळविण्यासाठी धावाधाव करतात. पी ॲन्डी टी काॅलनी भागात पाण्याची टंचाई आहे. हे माहिती असुनही हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पालिका अधिकारी प्रयत्न करत नाहीत. थोडे दिवस हा प्रश्न आहे, अशी तकलादू कारणे सांगतात. एमआयडीसीचे अधिकारी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करत नाहीत त्यामुळे ही टंचाई निर्माण होत आहे, असे या भागातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे यांनी सांगितले.
पालिका, एमआयडीसीकडे सतत पाठपुरावा करूनही पी ॲन्डी टी काॅलनी परिसराचा पाणी प्रश्न सोडविला जात नाही. त्यामुळे आम्ही पालिका आयुक्तांचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला आहे, असे मोर्चेकरांनी सांगितले. हा प्रश्न मोर्चा काढूनही सुटला नाहीतर मात्र रहिवाशांचे बेमुदत उपोषण पालिकेसमोर सुरू करण्यात येणार आहे. मोर्चात महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक अधिक संख्येने सहभागी झाले होते. अनेक महिलांनी कार्यालयात सुट्टी घेऊन मोर्चात सहभागी होणे पसंत केले होते.

