डोंबिवली – डोंबिवलीत पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे आयोजित पुस्तक आदान प्रदान सोहळ्यात एकलव्य आर्ट फोरम आणि श्री मुद्रा कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनादी मी अनंत मी’ हा स्वा. सावरकरांच्या विचारधारेवर आधारित कार्यक्रम साजरा झाला. त्याचवेळी ‘केसरी ते सिंदूर’ या संकल्पनेतून राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना आणि सांस्कृतिक वारसा यांचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रस्त्यावरील गोयंका शाळेत आदान प्रदान कार्यक्रम सुरू आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात एकलव्य आर्ट फोरमच्या आदान प्रदान गीत नृत्याने झाली. त्यानंतर ‘जय देव जय देव’, ‘जयोस्तुते’, ‘ने मजसी ने’, ‘हे हिंदू नृसिंह’, ‘अनादी मी अनंत मी’, अशा अनेक सादरीकरणांनी प्रेक्षकांना भारावून टाकले. एकलव्य आर्ट फोरमच्या कलाकारांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रभावी आणि देशभक्तीपूर्ण कार्यक्रमाने राष्ट्रभक्तीचे जागरण केले. या कार्यक्रमाला पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, अलका मुतालिक, माधव जोशी, रोहिणी लोकरे, डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे ॲड. सुहास तेलंग उपस्थित होते.
दगडी भिंत संवाद
या कार्यक्रमात ‘मेकींग ऑफ दगडी भिंत’ हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे ५५० नाटकांमधून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संपदा जोगळेकर कुळकर्णी लिखित ‘दगडी भिंत’ या नाटकाच्या कलाकार व तंत्रज्ञांशी संवाद साधण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका दीपाली काळे यांनी १९८३ पासूनच्या संस्थेच्या कार्याचा आढावा घेत, हे नाटक साकारण्यासाठी घेतलेले कष्ट आणि आज स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.
दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक आशुतोष वाघमारे यांनी नाटक बसविताना हेलन केलर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास प्रत्येक कलाकारांच्या मनात रुजवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल सांगितले. कलाकारांनीही दिलेल्या साथीमुळे ‘दगडी भिंत’ उभी राहिली, असे त्यांनी नमूद केले. प्रकाश योजनाकार विनोद राठोड यांनी नाटकातील रंगछटा व प्रकाश योजनेचा वापर स्पष्ट केला, तर वेशभूषाकार मानसी साळवी यांनी पात्रानुसार वय आणि स्वभाव लक्षात घेऊन वेशभूषा निश्चित केल्याचे सांगितले.
नृत्यदिग्दर्शिका अवनी पटवर्धन यांनी कथ्थक नृत्याची पार्श्वभूमी असूनही वेस्टर्न नृत्य शिकवताना केलेल्या अभ्यासाची माहिती दिली. नाटकातील कलाकार श्रुती गणपुले, निखिला इनामदार, अथर्व नाईक आणि वंशिका इनामदार यांनी आपल्या भूमिकांसाठी केलेला अभ्यास आणि त्यातून झालेला वैयक्तिक अनुभव मांडला. श्रीकला संस्कार न्यास संस्थेच्या अध्यक्षा ज्योती दाते यांनी नाटक निर्मितीतील अडचणींचा उल्लेख करत डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात सरावासाठी परवडणाऱ्या जागेची कमतरता असल्याची खंत व्यक्त केली. तसेच नाटक निर्मितीचा वाढता खर्च, विशेषतः जागेचा खर्च, हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मुलाखत वृशांक कवठेकर यांनी केले.
एकलव्य आर्ट फोरम आणि श्री मुद्रा कलानिकेतनचे कलाकार.
