डोंबिवली – डोंबिवलीतील बावनचाळ भागातील रेल्वे मैदानात रेल्वेची परवानगी न घेता क्रिकेट मैदानाच्या बाजुला असलेल्या झाडीत अज्ञात इसमाने ३५ ट्रक बेकायदा माती आणून टाकली. रेल्वेच्या हद्दीत रेल्वेची परवनगी न घेता अशाप्रकारे नियमबाह्य पध्दतीने ही माती आणून टाकल्याने रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी ही बेकायदा माती आणून टाकणाऱ्या अज्ञात इसमा विरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी भारतीय जमीन महसूल कायदा आणि रेल्वे कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. सव्वा पाच लाख रूपये किंमतीची ही ३५ ट्रक माती आहे.
डोंबिवलीतील बावनचाळ हा रेल्वेच्या मालकीचा भाग आहे. या भागात रेल्वेची ६५ हून अधिक एकरची जमीन आहे. यामधील १५ ते २० एकरचा परिसर हा झाडाझुडपांनी वेढलेला आणि काही भाग मोकळा आहे. त्यामुळे डोंबिवलीतील रहिवासी सकाळ, संध्याकाळ या निसर्गरम्य भागात नियमित फिरण्यासाठी येतात. हा भाग अडगळीचा असल्याने या भागात अनेक गैरप्रकार होत होते. ठाकुर्ली पुलावरून उतरल्यानंतर डोंबिवली शहराच्या गणेशनगर, महात्मा गांधी रस्ता भागात जाण्यासाठी या रेल्वे मैदानातून रस्ते आहेत.
नागरिकांची या भागात सतत वर्दळ असते. त्यामुळे मागील तीन वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी, मनसेचे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वे मैदानाचा कचरा, घाणीने भरलेला परिसर स्वखर्चाने स्वच्छ केला. या भागात नागरिकांना चांगल्या पध्दतीने चालता येईल. या भागातील दुर्गंधी नष्ट होईल. या भागातील खाचखळगे बुजवून टाकण्यासाठी त्यांनी काही भागाच सपाटीकरून घेतले. रेल्वेच्या जागेवर हे अतिक्रमण केले जाते की काय म्हणून दोन वर्षापूर्वी रेल्वेने नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी बावनचाळ मैदान भागात केलेल्या सुविधा तोडून टाकल्या होत्या. तरीही आपण हे फक्त लोकांच्या हितासाठी करत आहोत. यामध्ये आपला कोणताही स्वार्थ नाही. ज्यावेळी रेल्वेला ही जागा हवी असेल तर त्यावेळी त्यांच्या पध्दतीने या जागेचा वापर करावा,असे मत त्यावेळी नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे व्यक्त केले होते.
त्यानंतर नगरसेवक म्हात्रे यांनी तोडलेल्या सुविधा पुन्हा सुस्थितीत केल्या. या भागात खेळाचे मैदान तयार करून दिले. स्वखर्चाने या भागात सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बाकडे, जमिनीवर बसण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. सकाळ, संध्याकाळ या भागात नागरिकांची वर्दळ होती. या सुविधा गेल्या काही दिवसापूर्वी रेल्वेने पुन्हा तोडून टाकल्या होत्या. त्या खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुन्हा सुस्थितीत करण्यात आल्या.
रेल्वेची वक्रदृष्टी
रेल्वेचे अधिकारी ठाकुर्ली विभागाचे अभियंता वासुदेव वासुदकर आपल्या सहकाऱ्यांसह बावनचाळ रेल्वे मैदान भागात पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना या भागात कोणतेही अतिक्रमण आढळून आले नव्हते. दोन दिवसांनी पुन्हा ते या भागात पाहणी दौऱ्यासाठी आले, तेव्हा त्यांना बावनचाळ रेल्वे मैदानात क्रिकेट मैदानाच्या बाजुला झाडीत ३५ ट्रक माती अज्ञात इसमाने आणून टाकल्याचे दिसले.
रेल्वेने अशाप्रकारे कोणालाही रेल्वे मैदानात माती आणून टाकण्यास परवानी दिली नाही. तरीही ही माती याठिकाणी टाकल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे निदर्शनास आल्यावर अभियंता वासुदकर यांनी हा प्रकार आपले वरिष्ठ अभियंता बिनयकुमार यांना ही माहिती दिली. बिनयकुमार, वासुदकर आणि रेल्वे सुरक्षा बळाचे जवान बावनचाळ भागात दाखल झाले. ही माती नियमबाह्यपणे आपल्या हद्दीत आणून टाकले असल्याचे निदर्शनास आल्यावर बिनयकुमार यांच्या आदेशावरून हा गैरप्रकार करणाऱ्या इसमा विरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
