डोंबिवली : डोंबिवलीतील एक प्रवासी गुरूवारी मुंबईहून डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करत असताना जवळील पिशवी डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरताना लोकलमध्ये विसरला. घरी गेल्यानंतर या प्रवाशाला आपण जवळील एक लाख ६२ हजार रूपयांची पिशवी लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आले. ही पिशवी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकलमध्ये गस्त घालताना आढळली. पोलिसांनी या प्रवाशाचा शोध घेऊन त्याची रोख रक्कम असलेली पिशवी त्याला परत केली. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराच्या प्रामाणिकपणामुळे ही पैशांची पिशवी प्रवाशाला परत मिळाली.
जयराम संजीव शेट्टी (४२) असे लोकलमध्ये पिशवी विसरलेल्या प्रवाशाचे नाव आहे. जयराम शेट्टी गुरुवारी आपल्या काही कामानिमित्त डोंबिवलीहून विक्रोळी येथे गेले होते. काम उरकून ते संध्याकाळी डोंबिवलीतील घरी येण्यास निघाले. विक्रोळी रेल्वे स्थानकात त्यांनी कल्याणला जाणारी लोकल पकडली. या लोकलने प्रवास करत असताना त्यांनी आपल्या जवळील एक लाख ६२ हजार रूपयांची पिशवी लोकलमधील मंचकावर ठेवली. स्वतः मोबाईलमध्ये व्यस्त झाले.
हेही वाचा…डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कोंडीने प्रवासी हैराण
डोंबिवली रेल्वे स्थानक आल्यानंतर घाईगडबडीत ते लोकलमधील मंचकावर ठेवलेली पिशवी घेण्यास विसरले. घरी गेल्यानंतर शेट्टी यांना आपली रोख रक्कम असलेली पिशवी आपण लोकलमध्ये विसरल्याचे लक्षात आल्यावर ते अस्वस्थ झाले. दरम्यान, लोकल डोंबिवली सोडून कल्याणच्या दिशेने रवाना झाली होती. १५ ऑगस्ट निमित्त डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस ठाकुर्ली रेल्वे स्थानकात गुरुवारी संध्याकाळी गस्त घालत होते.
ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकल आल्यावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यातील हवालदार चौधरी, महिला पोलीस हवालदार बांबले, बोईनवाड, महिला हवालदार जाधव हे लोकल डब्यात काही संशयास्पद वस्तू नाही ना याची तपासणी करण्यासाठी चढले. त्यांना मधल्या लोकल डब्यात मंचकावर एक काळी पिशवी असल्याचे दिसले. आणि तेथे कोणीही प्रवासी बसला नसल्याचे दिसले. संशय आल्याने पोलिसांनी त्या पिशवीची छायाचित्रे काढली. तेथे त्या पिशवीची तपासणी केली. त्यात त्यांना दीड लाखाहून अधिकची रोख रक्कम आढळली. या पिशवीतील कागदपत्रांप्रमाणे ही पिशवी डोंबिवलीतील जयराम शेट्टी यांची असल्याचे निदर्शनास आल्यावर पोलिसांनी शेट्टी यांना संपर्क केला. त्यांना डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांची पिशवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या उपस्थितीत त्यांना परत करण्यात आली.