डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानक स्वच्छ राहील यासाठी दिवसभर या रेल्वे स्थानकात रेल्वे सफाई कामगारांकडून स्वच्छता मोहीम सुरू असते. काही वेळा स्वच्छता यंत्राजवळ उभे राहून मोबाईलमध्ये छायाचित्रे काढून स्वच्छता न करता स्वच्छता केल्याचा देखावा उभा केला जातो. फलाटावरील या दररोजच्या स्वच्छतेमुळे प्रवासी समाधान व्यक्त करतात. परंतु, फलाटांच्या मागील बाजू, जिन्या खालचे भाग, रेल्वे रूळांमधील अंतरातील मधल्या जागा कचरा, मातीचे ढीग. दुर्गंधी, गर्दुल्ले, मद्यपी, गांजा सेवकांचे अड्डे झाले आहेत.

भटकी कुत्री रेल्वे स्थानकाच्या या मोकळ्या जागेतील माती, टाकाऊ कचऱ्याचे ढीगांवर लोळत असतात. रात्रीच्या वेळेत या भागात गांजा सेवन करताना पोलिसांनी गर्दुल्ले, गांजा सेवकांना यापूर्वी पकडले आहे. रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करणारे फेरीवाले आपले सामान ठेवण्यासाठी रेल्वे स्थानकातील या अडगळीच्या जागेचा वापर करतात. घाणीमुळे या भागात विविध प्रकारचे कीटक, डास यांचा उपद्रव असतो, असे प्रवाशांनी सांगितले.

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम मागील दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. या कामासाठी लागणारे सामन, मलबा, ग्रीट, खडीच्या गोणी या भागात पडलेल्या आहेत. रेल्वे जिने, पादचारी पुलांच्या खाली कचराभूमीसारखी परिस्थिती आहे. या भागातून जाणे अवघड आहे इतकी भयावह परिस्थिती डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या वावरणाऱ्या प्रवाशांच्या नजरेत न येणाऱ्या अडगळीच्या भागात आहे. या घाणीतून बाहेर पडणारे कीटक, जंतू, डास आरोग्याचे प्रश्न निर्माण करतात. पावसाचे पाणी या घाणीत साचलेलेअसते. तेथे डासांची उत्पत्ती होते. या घाणीच्या भागात फिरणारी भटकी कुत्री फलाटावर सतत फिरत असतात. त्यांच्या अंगाची घाण फलाटावर पडत असते. फलाटावर लोकलमधून मासळीच्या टोपल्या मासळी विक्रेत्यांनी उतरून घेतल्या की हीच भटकी कुत्री त्या मासळीच्या टोपल्यांजवळ जाऊन माशाचे तुकडे पळविण्याचा प्रयत्न करतात, असे प्रवाशांनी सांगितले.

त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात फलाटावर रेल्वेकडून ज्याप्रमाणे दररोज स्वच्छता केली जाते. तशीच स्वच्छता मोहीम एक दिवस रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गालगतच्या मागील, अडगळीच्या भागात, पादचारी पूल, जिन्यांखाली राबवावी. तेथील अनेक वर्षाची घाण,कचरा काढुन तो भाग स्वच्छ करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकात नियमित साफसफाई केली जाते. प्रवाशांना कचरा, घाणीचा त्रास होईल असे चित्र फलाटावर नसते. परंतु, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटाच्या प्रवाशांना झटकन नजरेत न येणाऱ्या अदर्शनी भागात मातीचे ढीग,कचरा, गर्दुल्लेंचे अड्डे, फेरीवाल्यांचे सामान पडलेले आहे. अस्वच्छता त्या भागात दिसते. हे चित्र बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा. – लता अरगडे अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.

रेल्वे स्थानक कुठलेही असो. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात जशी नियमित स्वच्छता केली जाते. तशी रेल्वे स्थानकाच्या पाठीमागील, जिने, पादचारी पुलाखाली आठवड्यातून सफाई झालीच पाहिजे. अन्यथा या कचरा, घाणीवर डास, आरोग्याला घातक कीटक तयार होतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे रेल्वे स्थानक कुठलेही असो. त्या दर्शनी, पाठीमागील भागात स्वच्छता नियमित झालीच पाहिजे. – शैलेश राऊत अध्यक्ष, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटना.