डोंबिवली – कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबई सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल गुरूवारी सकाळी १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. यामुळे कामावर वेळेवर पोहचणे शक्य नसल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवासी मिळेल ती लोकल पकडून आपला मुंबईचा प्रवास सुरू करत होते. अनिश्चित वेळेने लोकल फलाटावर येत असल्याने आणि पाठीमागील लोकल कधी येईल याची शाश्वती नसल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकात एका तरूणाने फलाट क्रमांक पाचवर आलेल्या लोकलमध्ये रेल्वे मार्गात उभे राहून विरूध्द बाजुच्या दरवाजातून लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरवाजा बहाद्दर चिवट प्रवाशांनी डब्यात गर्दी नाही म्हणून त्याला डब्यात घेण्याऐवजी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला.
गुरूवारी सकाळी साडे आठ वाजण्याचा दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात हा प्रकार घडला. फलाट क्रमांक चारवरील प्रवासी हा सगळा प्रकार पाहत होते. या तरूणाला लोकल दरवाजातील हटवादी प्रवासी दरवाजातून डब्यात जाण्यास मार्ग देत नव्हते. हा तरूण डब्यात घुसण्यासाठी प्रयत्न करत होता. आतमध्ये जागा नाही असे सांगून प्रवासी त्याला दरवाजातून खाली उतरण्यास किंवा दरवाजात लोंबकळत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रवाशाला लोकल दरवाजातील आणि डब्यातील प्रवासी आत घेत नाहीत पाहून तो पुढे काही अंतरावर लोकलने वेग घेतल्यावर लोकलमधून रेल्वे मार्गात पडण्याची शक्यता होती.
त्यामुळे फलाट चार वरील प्रवाशांनी मोठ्याने ओरडा करत लोकल दरवाजात लोंबकळत असलेल्या प्रवाशाला आतमध्ये जाण्यासाठी तरी किमान रस्ता द्या, असा गलका केला. प्रवाशांनी ओरडा केल्यानंतर फलाट पाच वरील प्रवाशांनी गच्च भरलेल्या लोकलमधील दरवाजातील प्रवाशांनी विरूध्द बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न केलेल्या तरूण प्रवाशाला डब्यात शिरकाव करण्यास जागा दिली, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
यापूर्वी टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अति जलद लोकलमध्ये किमान चढण्याची संंधी होती. आता या लोकल आहे त्या ठिकाणाहून प्रवाशांनी गच्च भरून येतात. कल्याण रेल्वे स्थानकात त्यात प्रवाशांना पाय ठेवायला जागा नसते. ही लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात आली की कल्याण रेल्वे स्थानकात या लोकलमध्ये चढलेले प्रवासी डब्याला, दरवाजाला लोंबकळत असल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांना या लोकलमध्ये चढण्यास मिळत नाही. त्यामुळे प्रवासी आता दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांप्रमाणे रेल्वे मार्गात उतरून विरूध्द बाजुने डब्यात चढण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. प्रवाशांनी रेल्वे मार्गात उतरून लोकल पकडू नये म्हणून संरक्षित उंच जाळ्या रेल्वे मार्गात बसविण्यात आल्या आहेत. तरीही अनेक प्रवासी त्या जाळ्यांजवळ पाय ठेवण्यासाठी मोठा दगड ठेवतात. त्या दगडावर पाय ठेऊन संरक्षित जाळ्यांवर उभे राहून मग लोकल डब्यात चढतात.
अशा दरवाजात लोंबकळणारे प्रवासी लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर वेग घेतला की आतून गर्दीचा दाब येऊन तोल जाऊन रेल्वे मार्गात पडून मृत्यूमुखी पडतात. गुरूवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने दुरुस्तीच्या कामामुळे लोकल उशिराने धावत असल्याचे रेल्वे सुत्राने सांगितले.

