डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर गेल्या महिनाभराच्या कालावधीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग आणि फ प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फेरीवाला मुक्त करण्यात यश मिळवले आहे. या विभागात चोरून लपून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे सामान पालिका कामगार जप्त करत आहेत. अशाच एका फेरीवाल्याचे सामान जप्त करत असताना एका परप्रांतीय फेरीवाल्याने पालिकेच्या मराठी कामगाराला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात कामगाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. धीरज भरत अंकुशे (३१) असे तक्रारदार कामगाराचे नाव आहे. ते कल्याण डोंबिवली पालिकेत कंत्राटी पध्दतीने अतिक्रमण नियंत्रण विभागात काम करतात. ते पर्यवेक्षक आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी केला आहे. या दोन्ही विभागातील अतिक्रमण नियंत्रण पथके सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत डोंबिवली पूर्व फेरीवाला मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या महिनाभराच्या कालावधीत या दोन्ही प्रभागांमधील रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले कायमचे हटविण्यात फेरीवाला हटाव पथकांना यश आले आहे.
फेरीवाल्यांविरूध्द एवढी आक्रमक कारवाई सुरू असताना शुक्रवारी रात्री पालिका कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे या कालावधीत पालिकेचे फेरीवाला हटाव पथक येणार नाही असा विचार करून परप्रांतीय फेरीवाला सानु रामभवन साहु (२५) हा फेरीवाला रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे तिकीट खिडकी समोरील रस्त्यावर रस्ता अडवून मोबाईलची कव्हर विक्री करण्याचा व्यवसाय करत होता. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास त्रास होत होता.
ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक साहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानक भागात आले. त्यांना सानु साहु हा रेल्वे स्थानक भागात मोबाईल कव्हर विक्री करत असल्याचा आढळून आला. फेरीवाला पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला सामानासह रोखून धरले. त्याच्या जवळील मोबाईल कव्हरचा सर्व साठा जप्त केला. फेरीवाला हटाव पथकातील पर्यवेक्षक धीरज अंकुशे यांनी सानु साहुचा मोबाईल कव्हरचा साठा ताब्यात घेऊन तो जप्त करून टेम्पोत टाकविण्यासाठी चालविला असताना, सानु साहुने अंकुशे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. आणि सामान सोडून देण्याची मागणी केली. अंकुशे यांनी त्यास नकार देताच साहुने त्याला मारण्याची धमकी दिली.
तीन टेम्पो सामान जप्त
सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात ग आणि फ प्रभागाने संयुक्त कारवाई करून फेरीवाल्यांनी रेल्वे हद्दीत विविध ठिकाणी लपून ठेवलेले दोन टेम्पो सामान जप्त केले. हे जप्त केलेले सामान पुन्हा फेरीवाल्यांना मिळू नये म्हणून ते कल्याण येथील भंगार साठा केंद्रावर नेण्यात आले. अनेक वर्षांनी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. डोंबिवली पूर्वेतील ग प्रभागातील बदली झालेला कामगार त्याच्या मूळ जागी केला की पूर्व भागातील फेरीवाल्यांचा विषय कायम मिटणार आहे. अनेक वर्ष फेरीवाला मुक्त असलेला डोंबिवली पश्चिम मात्र या प्रभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे फेरीवाले, आठवडी बाजारांनी गजबजून जाऊ लागला आहे.
