कल्याण : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ग आणि फ प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम पालिकेकडून सुरू आहे. पूर्व रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्वेत ग प्रभागातील फेरीवाले एवढी आक्रमक कारवाई सुरू असुनही हटत नसल्याने या सर्व फेरीवाल्यांच्या पाठीशी ग प्रभागाचे फेरीवाला पथक प्रमुख अरूण जगताप असल्याची खात्रीलायक माहिती आयुक्त अभिनव गोयल यांना मिळाली. अखेर, वरिष्ठांच्या आदेशावरून गुरुवारी रात्री ग प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख जगताप यांना तात्काळ पदावरून हटविण्याचे आदेश देण्यात आले.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाने पथक प्रमुख अरूण जगताप यांना पथकप्रमुख पदावरून हटविण्याची कार्यवाही केली. जगताप यांची पालिकेतील मूळ नियुक्ती सफाई कामगार आहे. पण, मुकादम म्हणून प्रभागात आदेश घेऊन यायचे आणि हळूच तेथील फेरीवाला हटाव पथकात राजकीय दबाव आणून दाखल व्हायचे ही जगताप यांची अनेक वर्षाची पध्दत आहे. जगताप यांच्या बदलीचा आदेश आयुक्त गोयल यांच्या आदेशावरून ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी गुरूवारी रात्री काढला. अतिशय गोपनीय पध्दतीने आयुक्त, सामान्य प्रशासन साहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे यांच्या आदेशावरून ही कार्यवाही करण्यात आली.
कारवाईत अडथळे
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील ग आणि फ प्रभाग हद्दीतील फेरीवाले हटविण्याची मोहीम अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या उपस्थितीत भारत पवार, प्रसाद ठाकूर या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून सुरू आहे. ग प्रभागाच्या हद्दीत रेल्वे स्थानक भागात पालिका पथके निघून गेली की पुन्हा फेरीवाले बसत असल्याचे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथके सकाळ ते रात्री उशिरापर्यंत आपल्या प्रभागात एकही फेरीवाला बसून देत नाहीत. मग, ग प्रभागात रेल्वे स्थानक भागात डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी परिसरात फेरीवाले सतत ठाण मांडून का बसतात, असे प्रश्न पालिका वरिष्ठांना पडले होते.
जगताप आश्रयदाता
पथकप्रमुख जगताप फेरीवाल्यांचे अनेक वर्षाचे पाठीराखे असल्याची पालिकेतील चर्चा आहे. मागील अनेक वर्ष ते डोंबिवलीत फ, ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकात होते. फेरीवाल्यांची त्यांची सलगी आहे. त्यांची यापूर्वी टिटवाळा अ प्रभागात बदली झाली होती. ते पुन्हा राजकीय दबाव आणून ग प्रभागात फेरीवाला हटाव पथकात दाखल झाले होते. ग प्रभागातून जगताप यांची बदली होत नाही तोपर्यंत ग प्रभागातील फेरीवाला विषय मार्गी लागणार नाही, अशी खास माहिती काही नगरसेवक, जाणकार नागरिक यांनी आयुक्त, उपायुक्तांपर्यंत पोहचवली होती. या सर्व माहितीची खात्री करून आयुक्तांनी जगताप यांना तातडीने पदावरून हटविण्याचे आदेश दिले. जगताप यांच्या जागी श्रावण पाटील यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद
डोंबिवली, कल्याण ग्रामीण मधील शिंदे शिवसेनेचा एक तळमळी लोकप्रतिनिधी जगताप यांची पाठराखण करत असल्याची पालिकेत चर्चा आहे. या नेत्याच्या आशीर्वादामुळे जगताप पालिकेत मिळेल ते पदस्थापना मिळविण्यात यशस्वी होत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. या नेत्याच्या पाठबळामुळे जगताप घनकचरा विभागात सफाई कामगार पदावर हजर होतो की नाही. तेथेही हा शिंदे शिवसेनेचा लोकप्रतिनिधी अडसर आणतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कल्याण ग्रामीणमधील बेकायदा बांधकामे वाचविणे, एमआरटीपीचे गुन्हे रोखण्यासाठीही हा लोकप्रतिनिधी पुढाकार घेत असल्याची चर्चा आहे.
