Dombivli railway station illegal gas cylinder food vendor: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला काही दिवसांपासून एक व्यक्ती गोणीत गॅस सिलिंडर भरून त्याचा वापर हातगाडीवरील खाद्यपदार्थ तळण्यासाठी करत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. तेव्हा सुरक्षिततेचा विचार करून पालिका, पोलीस वा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात काही महिन्यांपूर्वी एका राजकीय नेत्याच्या व लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने पाच ते सहा हातगाड्या सकाळच्या वेळी लावण्यात येत होत्या. या हातगाड्यांवरून उत्तप्पा, मेदु वडा, वडापाव, शिरा, उपमा असे पदार्थ विकले जात होते. हे पदार्थ तयार करण्यासाठी उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येत होता. सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करण्यास प्रतिबंध आहे. तरीही काही विक्रेते हे धाडस करीत होते.

डोंबिवली पूर्वेला उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यान्न तयार केले जात असल्याचे लक्षात आल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी या हातगाड्यांवर पाळत ठेऊन त्या हातगाड्या व सिलिंडर जप्तीची कारवाई केली होती. मागील काही महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ, उघड्यावरील पदार्थ, गलिच्छ भटारखाने यांच्या विरुद्ध मोहीम उघडली आहे. तेव्हापासन डोंबिवली, कल्याण स्थानक भागात उघड्यावर सिलिंडर ठेऊन हातगाडीच्या माध्यमातून सकाळच्या वेळेत खाद्यान्न विक्री करणारे विक्रेते बंद झाले.

आता डोंबिवलीत काही दिवसांपासून एक विक्रेता सकाळी सहा ते सकाळी साडेदहा या वेळेत डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात हातगाडी लावतो. या हातगाडीजवळ कोणाला दिसू नये म्हणून गोणीत सिलिंडर भरून ठेवतो. या सिलिंडरच्या माध्यमातून उघड्यावर खाद्यान्न विक्री करतो. उघड्यावर बिनधास्तपणे हा विक्रेता गॅस सिलिंडर लावत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.