डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन वरील फलाट विस्तारिकरण, मार्गिका बदल, सांधेजोडाची कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रेल्वे प्रशासनाने मेगाब्लाॅक घेतला आहे. हे काम रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाचे नियोजन होते. पण, या कामाची वेळ थोडी वाढण्याची शक्यता उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मागील आठवड्यात मेगाब्लाॅक दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवरील दिवा बाजूकडील वळण मार्ग, फलाट विस्तारिकरणासाठी आव्हानात्मक जागेत खोदकाम आणि इतर आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केली होती. या कामांमधील काही कामे शिल्लक होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी शनिवारी रात्री १२ ते रविवार सकाळी १० असा रेल्वेने मेगाब्लाॅक घेतला आहे.
रात्री बारा वाजल्यापासून डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक, एक ए, दोनवर येणाऱ्या लोकल जलद मार्गावरील फलाट क्रमांक तीन, चार आणि पाचवरून वळविण्यात आल्या आहेत. सीएसएमटीकडून कल्याण, डोंबिवलीकडे येणाऱ्या काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लाॅक कालावधीत ठाणे, डोंबिवली लोकलच्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत. रविवार असुनही विविध प्रकारचे कार्यक्रम, शाळांना सुट्टी असल्याने अनेक पालक फिरण्यासाठी मुंबई परिसरात कुटुंबीयांसह निघाले आहेत. अशा प्रवाशांची गर्दी फलाटावर आणिलोकलमध्ये दिसत आहे. कल्याणकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि सीएसएमटीकडून कल्याणकडे येणाऱ्या अनेक लोकलना कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांमध्ये थांबा नाही. त्यामुळे हे प्रवासी जवळच्या रेल्वे स्थानकात जाऊन इच्छित स्थळाचा प्रवास करत आहेत.
मेगाब्लाॅक काळात डोंबिवली रेल्वे स्थानक भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. अनेक प्रवासी मेगाब्लाॅक काळात रेल्वे मार्गिकेतून चालतात. यावेळी अन्य रेल्वे मार्गिकेतून येणाऱ्या उपनगरीय लोकल, एक्सप्रेस गाडीचा अनेक वेळा प्रवाशांना अंदाज येत नाही. यामुळे अशा कालावधीत अपघातात होतात. हे टाळण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक मीना, साहाय्यक व्यवस्थापक शिवचंद्र शुक्ला, मिथुन गायकवाड, चंदन रजक हे मेगाब्लाॅकच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. मेगाब्लाॅक काळात एकावेळी अनेक कामांचे नियोजन असल्याने सुमारे ५०० कामगार डोंबिवली रेल्वे स्थानक भागात कार्यरत आहेत.
या मेगाब्लाॅकच्या कामामुळे सीएसएमटीकडून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल सरळ रेल्वे मार्गिकेतून वळण, सांधेजोडमध्ये वेळ न घेता थेट कल्याण दिशेने धावणार आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक, एक एवरील कल्याण आणि दिवा बाजूकडील वळणामुळे लोकल एक ए या डोंबिवली लोकल थांब्याच्या फलाटावर आणून मग त्या कल्याणकडे नेण्यात येत होत्या. या प्रकाराने अनेक वेळा डोंबिवली लोकल येण्यास, सुटण्यास विलंब होत होता. आता कल्याण दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल यापुढे फलाट क्रमांक एकवरून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
