Dombivli Railway Station Milk Vendors Cans: डोंबिवली रेल्वे स्थानकात साधारण १५ ते ३० सेकंदांपर्यंत थांबणारी उपनगरी रेल्वे गाडी व तितक्याच वेळेत रेल्वेगाडीच्या माल डब्यातून दुधाच्या २० किटल्या फलाटावर उतरवणाऱ्या पाच ते सहा दूधविक्रेत्यांच्या कौशल्याची काही क्षण प्रवाशांना भुरळ पडत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानक परिसरातून दररोज पहाटे पाच वाजता किटल्यांमधून सुमारे २०० ते ३०० लिटर दूध घेऊन निघणाऱ्या विक्रेत्यांची डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी गर्दीच्या वेळी मोठी कसरत असते. त्यात माल डब्यातील प्रवाशांची घुसखोरीचाही या दूधविक्रेत्यांना सामना करावा लागतो. वजनदार किटल्यांचे पाच ते सहा दूधविक्रेत्यांसमोर मोठे आव्हान असते.
मागील २० ते २५ वर्षांपासून हे दूधविक्रेते कसारा ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस उपनगरी रेल्वेगाडीने प्रवास करतात. ते डोंबिवली स्थानकात उतरतात. या विक्रेत्यांसोबत दुधाच्या वजनदार स्टीलच्या किटल्या असतात. पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान कसारा येथून सीएसएमटी दिशेने सुटणाऱ्या गाडीने ते प्रवास सुरू करतात. ही गाडी सकाळी ७.२८ वाजता डोंबिवली स्थानकात येते. ही कसारा गाडी कल्याण ते सीएसएमटी अतिजलद गतीने धावते. त्यामुळे नोकरदार वर्ग या लोकलला सर्वाधिक पसंती देतो. कसारा परिसरात जंगल पट्टा अधिक प्रमाणात आहे.
त्यामुळे या भागात पशुपालन व्यवसाय अधिक प्रमाणात केला जातो. बारही महिने मुबलक प्रमाणात चारा, पाणी उपलब्ध असल्याने कसारा परिसरातील गावे, आदिवासी वाड्यांमध्ये गाई, म्हशी पालन व दूध विक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यापूर्वी हे दूधविक्रेते पाच ते सहा किटल्यांच्या माध्यमातून डोंबिवली शहरात दूध विक्री करायचे. अतिशय उत्तम दर्जाचे म्हशीचे दूध घराच्या दारात मिळत असल्याने डोंबिवलीतील अनेक रहिवासी कसाराकडून येणाऱ्या दूध खरेदीला सर्वाधिक पसंती देतात. या दुधामुळे घरात दही, तूप तयार होते, असे दूध खरेदीदार ग्राहकांचे म्हणणे आहे.
किटल्यांचा बाजार
हे दूध विक्रेते पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान आपला दिवस सुरू करतात. दूधाच्या किटल्या घेऊन ते साडे चार ते पाचच्या दरम्यान टेम्पोने कसारा स्थानकात पोहोचतात. मालवाहू डब्यात किटल्या ठेवल्या की किटल्यांवर झोपून ते डोंबिवलीचा प्रवास सुरू करतात. कसारा ते डोंबिवली सव्वा दोन तासाच्या प्रवासात कसारा रेल्वेगाडी आटगाव, आसनगाव, टिटवाळा येथून प्रवाशांनी खच्चून भरते. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात या लोकलमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची उड्या पडतात. ही लोकल कल्याणपासून अतिजलद आहे.
या लोकलचा मालवाहू डबा प्रवाशांनी टिटवाळ्यापासून भरण्यास सुरूवात होते. सकाळच्या वेळेतील या रेल्वेगाडीतील तुडुंब गर्दी पाहून तिकीट तपासणीस या गाडीकडे फिरकत नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले. शहाड रेल्वे स्थानकापासून दूध विक्रेते दुधाच्या किटल्या प्रवासी गर्दीतून उतरविण्याच्या तयारीला लागतात. किटल्या उतरवण्याची दररोजची सवय असल्याने हे दूध विक्रेते लोकलने कल्याण स्थानक सोडले की किटल्या उतरविण्यासाठी सरसावतात.
‘तेवढे नुकसान होणारच’
डोंबिवली स्थानकात मालवाहू डब्यातून दूधाच्या किटल्या उतरविण्यात येतात याची जाणीव असल्याने प्रवासी या दूधविक्रेत्यांनी साधारण ३० सेकंदांत सहकार्य करतात. दूधविक्रेते तितक्या कालावधीत २० किटल्या प्रवाशांना बाजुला सारत फलाटावर मोठ्या खुबीने उतरवतात. हा किटल्या उतरविण्याचा दूधविक्रेत्यांचा खेळ बघण्यासारखा असतो, असे डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांनी सांगितले. किटल्या खूप बंदिस्त असतात. तरीही लोकलमधून किटल्या उतरवताना दूध झाकणातून बाहेर येते. तेवढे नुकसान आम्हाला दररोज सोसावे लागते, असे दूध विक्रेत्यांनी सांगितले. दुपारपर्यंत हे दूध घरोघरी, दूध डेअऱ्यांना वाटप करून आम्ही दुपारच्या कसारा गाडीने परतीच्या प्रवासाला निघतो, असे कृष्णा वाघ या दूधविक्रेत्याने सांगितले.
