डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील फलाटाची एक लादी सैल होऊन खचली आहे. अनेक दिवस प्रवाशांना या लादीवरून चालताना ती गचका देत होती. अखेर ही लादी एकाच जागी खचून पडली आहे. या लादीच्या आजुबाजुच्या लाद्याही त्यामुळे सैल होऊन खचण्याची शक्यता आहे. या खचलेल्या लादीत सकाळ, संध्याकाळी घाईच्या वेळेत अनेक प्रवासी अडकून पडत आहेत. काहींच्या पायांना जोराने दणका बसत आहे.
लोकल फलाटावर आली की प्रवासी लोकल डब्याच्या दरवाजाच्या दिशेने पाहत चालत असतात. यावेळी अनेक प्रवाशांना ही तुटलेली लादी दिसून येत नाही. त्यामुळे काही प्रवासी या खचलेल्या लादीच्या भागात पाय अडकून पडतात. काही प्रवाशांचा पाय या खचलेल्या भागात जोराने आपटत आहे. लोकल पकडण्याची घाई असलेले प्रवासी आहे त्या परिस्थितीत बसलेला झटका सहन करत पुढचा प्रवास करत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान फिरत असतात. फलाट सफाई कामगारांची सफाईसाठी सतत वर्दळ असते. त्यांना ही तुटलेली लादी दिसत नाही का, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. घाईने एखादा बेसावध प्रवासी या खड्ड्यात जोराने आपटून थेट रेल्वे मार्गात पडण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. सुमारे तीन लाखाहून अधिक प्रवासी या रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करतात.
फलाट क्रमांक दोनवरून डोंबिवली ते सीएसएमटी लोकल सुटतात. तसेच, कल्याण दिशेकडे जाणाऱ्या बहुतांशी लोकल फलाट क्रमांक दोनवरून सुटतात. त्या सर्व प्रवाशांना या तुटलेल्या लादीचा फटका बसत आहे.
मागील अनेक दिवसांपासून ही लादी सैल झाल्याची जाणीव अनेक प्रवाशांना होती. अखेर ही लादी खचून एकाच जागी खड्ड्यात रूतून बसली आहे. या खचलेल्या लादीच्या आजुबाजुच्या भागातून प्रवासी येजा करतात. त्यामुळे त्या चार ते पाच लाद्याही आता सैल होऊ लागल्या आहेत. या लाद्या एकाचवेळी खचून प्रवाशांचा त्याचा त्रास होण्यापूर्वीच रेल्वेच्या बांधकाम विभागाने या
खचलेल्या लाद्यांकडे लक्ष देऊन त्यावेळीच सुस्थितीत करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. अनेक प्रवाशांनी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांना याबाबतची माहिती दिली. अरगडे यांनी यासंदर्भातची प्रत्यक्ष पाहणी करून त्या खचलेल्या लादीची प्रतिमा काढून ती रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. आणि प्रवाशांना काही दुखापत होण्यापूर्वी लादीचा तो भाग सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे.
