scorecardresearch

डोंबिवली रेल्वे स्थानकात छप्पर, सरकत्या जिन्याचे काम रखडले, प्रवाशांना उन्हाचे चटके

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील छपरावर पत्रे टाकण्याचे आणि याच फलाटावर सरकत्या जिन्यासाठी सुरू केलेले काम गेल्या महिनाभरापासून ठप्प आहे.

Dombivli railway station work pending
डोंबिवली रेल्वे स्थानकात छप्पर, सरकत्या जिन्याचे काम रखडले, प्रवाशांना उन्हाचे चटके (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

डोंबिवली – मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील छपरावर पत्रे टाकण्याचे आणि याच फलाटावर सरकत्या जिन्यासाठी सुरू केलेले काम गेल्या महिनाभरापासून ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहून लोकल पकडावी लागते. सरकत्या जिन्याच्या कामाच्या ठिकाणी संरक्षित जाळ्या लावल्या असल्याने गर्दीच्या वेळेत या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर मध्यवर्ती ठिकाणी फलाटावरील छपरावर पत्रे टाकण्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. हे काम आता थंडावले असल्याने आणि ५० फूट अंतराच्या परिसरात छपरावर पत्रे नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागते. काही प्रवासी सावलीचा आधार घेऊन उभे राहतात. लोकल येण्यापूर्वी या प्रवाशांना धावत जाऊन लोकल पकडावी लागते. फलाट तीन आणि चारवर मध्यवर्ती ठिकाणी सरकता जिना उभारणीचे काम सुरू आहे. या कामाची कोणतीही प्रगती नाही. या कामाच्या चारही बाजूने हिरव्या संरक्षित जाळ्या लावण्यात आल्या आहेत. प्रवासी त्या भागातून ये-जा करू शकत नाहीत. फलाटाच्या तीन आणि चार बाजूकडून लोकलमध्ये चढताना फक्त तीन ते चार फुटाची जागा उपलब्ध असते. या अपुऱ्या जागेतून लोकलमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी यांची दररोज झुंबड उडते. अनेक वेळा प्रवासी मोबाईल कानाला लावून या भागातून जात असतात. अशा वेळेत लोकल आली तर अपघाताची शक्यता आहे.

हेही वाचा – समाजमाध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र; औरंगजेबाचे उदात्तीकरण

हेही वाचा – ठाणे : मित्राला उसने पैसे देणे महागात; पैसे परत मागितल्याने एकाला सिमेंटची वीट फेकून मारली

सकाळी, संध्याकाळी या रखडलेल्या कामाच्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी उसळत असल्याने चेंगराचेंगरीची भिती असते. सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून डोंबिवली स्थानक ओळखले जाते. या स्थानकात प्रत्येक काम हाती घेताना रेल्वे प्रशासन या स्थानकातील गर्दीचा प्राधान्याने विचार करते. मग या स्थानकात सरकत्या जिन्याचे काम सुरू करून महिना उलटला तरी या कामाने अद्याप गती का घेतली नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
स्थानिक रेल्वे अधिकारी या विषयी काहीही बोलण्यास तयार नाहीत. काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम थांबले असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे काम लवकरच सुरू होईल, असे हा अधिकारी म्हणाला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 11:41 IST
ताज्या बातम्या