डोंबिवली – मागील पाच वर्षापासून डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्पाचा कायापालट करण्याची फक्त चर्चाच सुरू होती. आता या चर्चेला मूर्त रूप आले आहे. कल्याण, डोंबिवली पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील सॅटिस प्रकल्पाच्या नव्या उभारणीसाठी संयुक्त सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. नव्या सॅटिस प्रकल्पात नागरिकांना रेल्वे स्थानकात जाण्याचा सुकर मार्ग आणि वाहनतळाच्या सुविधेला सर्वाधिक प्राधान्य असणार आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी, रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांवर वाहनतळा अभावी दुचाकी वाहनांच्या लागलेल्या रांगा आणि दुचाकी वाहगनतळांनी भरून गेलेले रस्ते, यामुळे होत असलेली वाहन कोंडी, पादचाऱ्यांना होत असलेला त्याचा त्रास विचारात घेऊन खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली सॅटिस प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी ‘एमएमआरडीए’ अधिकाऱ्यांना कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांबरोबर सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. खासदारांच्या या सूचनेची दखल घेऊन पालिका आणि एमएमआरडीएने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या सॅटिस प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे.
सॅटिसची गरज
डोंबिवली शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि रेल्वे स्थानक परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासन, महापालिका अधिकारी आणि संबंधित विभागांसोबत वेळोवेळी बैठका घेत सॅटीस प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा केला. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनाही प्रत्यक्ष सर्वेक्षण करून प्रकल्पाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश आहेत. आता प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
सॅटिस संकुल
या प्रकल्पाअंतर्गत कल्याण-डोंबिवली पालिकेची इंदिरा चौकातील विभागीय इमारत, रामनगर पोलीस ठाणे, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय इमारत आणि परिसरातील उपलब्ध जागांचा एकत्रित वापर करून अत्याधुनिक पध्दतीने सॅटीस संकुल उभारण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने जागांचा वापर करत रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. सॅटीस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. प्रवाशांसाठी अधिक प्रमाणात वाहनतळ सुविधा, पादचारी मार्ग, वाहतुकीचे काटेकोर नियोजन, तसेच विविध नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे रेल्वे स्थानक परिसरातील दररोजची वाहन कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. डोंबिवली शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिम सॅटीस प्रकल्प मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून एमएमआरडीए आयुक्तालयात सातत्याने बैठका घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत प्रत्यक्ष संयुक्त सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. आता एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्था आणि वाहन व्यवस्थेला भविष्यात मोठा दिलासा देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न आहेत.
