डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील पूर्व भागातील कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारितील स्कायवाॅकचा लोखंडी संरक्षित कठड्याचा लोखंडी पाईप तुटला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत, घाई गडबडीत असलेला प्रवासी या तुटलेल्या लोखंडी कठड्याच्या बाजुने आधार नसल्याने थेट स्कायवाॅकवरून जमिनीवर पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तसेच, याच स्कायवाॅकच्या बाजूप्रभू चौकातील चढउताऱ्याच्या पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे दररोज प्रवासी या पायऱ्यांवर पडून पडत असल्याच्या घटना घडत आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकालगत पूर्व, पश्चिमेत जाण्यासाठी रेल्वे जिन्या लगत कल्याण डोंबिवली पालिकेने स्कायवाॅक उभारले आहेत. या स्कायवाॅकवरून प्रवासी पूर्व, पश्चिम भागात इच्छित स्थळी जातात. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थाकातून बाहेर पडल्यावर रेल्वे जिन्यालगत पायऱ्यांवरून उतरताना स्कायवाॅकचा असलेला लोखंडी कठड्याचा पाईप दोन ठिकाणी तुटला आहे. या तुटलेल्या पाईपमुळे प्रवाशांना गर्दी झाल्यावर उभे राहण्यासाठी असलेला आधार गेला आहे. अनेक वेळा सकाळ, संध्याकाळ या भागातून जाताना प्रवाशांची या भागात गर्दी असते. या गर्दीत येजा करताना प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून एखादा प्रवासी लोखंडी पाईपचा आधार नसल्याने स्कायवाॅकवरून जमिनीवर पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
अनेक वेळा महाविद्यालयीन विद्यार्थी या भागात घोळक्याने उभे असतात. मौजमजा करत असताना एखादा विद्यार्थी या पाईप तुटलेल्या भागातून थेट रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्रकल्प विभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. या विभागाने तातडीने या विषयाची दखल घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
पायऱ्या तुटल्या
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकात जाण्यासाठी किंवा बाहेर पडताना बाजीप्रभू चौकात जिना आहे. या जिन्याच्या पायऱ्या तुटल्या आहेत. काही ठिकाणी पायऱ्यांना आधार देणाऱ्या लोखंडी पट्ट्या तुटल्या आहेत. या तुटलेल्या पायऱ्यांमध्ये, लोखंडी पट्ट्यांमध्ये पाय अडकून दिवसातून तीन ते चार प्रवासी पडतात. अनेक वेळा काही विक्रेत्यांच्या खांद्यावर, डोक्यावर सामानाचे ओझे असते. हे ओझे घेऊन या तुटलेल्या पायऱ्या चढताना अनेक वेळा पाय घसरून सामान वाहून नेणारा कामगार घसरून पडतो. सकाळच्या वेळेत रेल्वे स्थानकात जाताना घाईत असलेले प्रवासी या पायऱ्यांच्या तुटलेल्या भागात अडकून घसरून पडतात. स्कायवाॅकचे काही भाग खराब झाले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या तुटलेल्या पाईप, खराब पायऱ्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेने या विषयाची दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले हा विषय प्रकल्प विभागाच्या अंतर्गत येतो. या विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवून याठिकाणची दुरुस्तीत तातडीने करण्यास सांगतो.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवाॅकच्या तुटलेल्या पायऱ्या, तुटलेला लोखंडी पाईप यामुळे काही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारित हा भाग येतो. अनेक प्रवाशांनी ही समस्या रेल्वेची असल्याचे समजून याविषयी आपल्याकडे तक्रारी केल्या आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने काही दुर्घटना घडण्यापूर्वी या दोन्ही ठिकाणची डागडुजी करावी. – लता अरगडे अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.
