डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानक भागात मागील काही दिवसांंपासून विविध फळांच्या तुकडे एक टाकाऊ कपमध्ये ठेऊन त्यात बर्फ आणि त्यावर प्लास्टिक कागद लावून नागरिकांना विक्री केली जात आहेत. ही फळे कोठून कधी आणलेली. हे तुकडे कशाने कापलेले आणि बर्फ कोठून आणलेला, असे अनेक प्रश्न या फळ तुकड्यांबद्दल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आरोग्याला घातक ठरणाऱ्या या फळ तुकडे विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हे फळ तुकडे विक्री करणारे बहुतांशी फेरीवाले हे मुंब्रा, भायखळा, मस्जिद, अंधेरी भागातील आहेत. नासका सडका फळांचा साठा खरेदी करायचा. त्या नासक्या, सडक्या फळांमधील चांगला भाग काढून घ्यायचा. ते फळांचे तुकडे रस्त्यावर मिळेल त्या पाण्यात आणि बादलीत टाकून धुतले जातात. आणि त्या फळाच्या चांगल्या भागाचे लहान तुकडे करून ते आरोग्याला घातक सांगितल्या गेलेल्या प्लास्टिक कपात दररोज डोंबिवली रेल्वे स्थानक भागात विक्री केले जात आहेत, अशी माहिती या फळ तुकडे विक्री व्यवहारावर नजर ठेऊन असलेल्या एका जाणकाराने दिली.

फळांचे ताजे तुकडे म्हणून नागरिक हे टाकाऊ कपांमधील फळांचे तुकडे खातात. पण त्यामुळे आरोग्याला अपाय होऊ शकतो. हे नासक्या, सडक्या फळांचे तुकडे कुठूनतरी आणलेल्या बर्फात टाकून विक्री केले जात आहेत. यामुळे तात्काळ नाही पण दूरवर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे एका आहारतज्ञाने सांगितले. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात हे फळ तुकडे विक्रेते दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात.

रेल्वे स्थानकातून मुंबई ते कल्याण, डोंबिवली प्रवास करून थकलेले, गर्दीचे धक्केबुक्के खाल्लेले अनेक प्रवासी रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यावर वडापाव किंवा इतर काही खाण्यापेक्षा फळांंचे तुकडे खाऊ म्हणून फळ तुकडे असलेले हे कप विकत घेतात आणि रस्त्याने खात खात रिक्षा वाहनतळ किंवा आपले घर गाठत असल्याचे चित्र रेल्वे स्थानक परिसरात दररोज दिसते.

पालिका अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक भागात आरोग्याला घातक पदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांना हटवावे अशी मागणी जाणकार नागरिक करत आहेत.

कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांनी बहुतांशी राजकारणी लोकांचा आशीर्वाद आहे. आणि या राजकीय लोकांचे पंटर पालिका फेरीवाला हटाव पथकात कामगार म्हणून काम करत आहेत. त्यामुळे या फेरीवाल्यांवर फक्त कारवाईचा देखावा नियमित उभा केला जात आहे. अनेक फेरीवाले हे फेरीवाला हटाव पथकातील कामगारांचे समर्थक, नातेवाईक असल्याची चर्चा आहे. या फेरीवाल्यांच्या माध्यमातून फेरीवाला हटाव पथके आणि नियंत्रक दरमहा लाखोचा दौलतजादा करत असल्याची चर्चा आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी अचानक रेल्वे स्थानक परिसरात फेरी मारून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.