डोंबिवली : डोंबिवली पूर्व रामनगर, राजाजी रस्ता भागात प्रवासी वाहतूक करताना रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या चार रिक्षाचालकांविरुद्ध रामनगर पोलिसांनी फौजदारी चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ५००हून अधिक रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

डोंबिवली पूर्व भागातील सहकार नगर आयरेगाव भागातील रहिवासी असलेले रिक्षा चालक शुक्रउद्दीन मस्तान मुल्ला (वय२८) हे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील तिकीट खिडकी येथे रिक्षा वाहनतळ नसताना तेथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने सकाळी रिक्षा उभी करून प्रवासी वाहतूक करत होते.

रामनगर पोलिसांच्या गस्ती पथकाने त्यांना त्या ठिकाणी रोखले. आणि ही प्रवासी वाहतुकीची जागा आहे का. रस्ता बंद करण्याचा आपणास अधिकार आहे का, असे प्रश्न करून सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला अडथळा म्हणून रामनगर पोलीस ठाण्यात हवालदार विजय बागुल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुल्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नांदिवली गाव नांदिवली रोड येथील पद्मनी प्लाझा येथे राहणारे रिक्षा चालक गौरव नाटेकर हे आपली रिक्षा रामनगर, राजाजी पथ येथील सार्वजनिक रस्त्याला अडथळा येईल अशा पद्धतीने उभी करून होते. पोलिसांनी त्यांना अशाप्रकारे वाहन उभी करण्यास मज्जाव केला. आणि त्यांच्या विरुद्ध हवालदार संदीप शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली मानपाडा रस्त्यावरील सागर काॅलनी भागात राहणारे सागर नारायण साळुंखे हे रिक्षा चालक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात राजाजी रस्ता भागात सकाळच्या वर्दळीच्या वेळेत वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करून प्रवासी वाहतूक करत होते. वाहतुकीला अडथळा आणला म्हणून हवालदार शिंदे यांनी सांळुंखे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य चौथ्या गु्न्हे प्रकरणात, डोंबिवली स्टार काॅलनी भागात साई बाबा मंदिर भागात राहणारे धनाशेखर नाडार हे रिक्षा चालक रामनगर भागातील स्वामी विवेकानंद रस्त्यावर हल्दीराम दुकानासमोर वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करून होते. रामनगर पोलिसांच्या गस्ती पथकाच्या हा प्रकार निदर्शनास येताच हवालदार अजय बागुल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नाडार यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. अनेक रिक्षाचालक झटपट प्रवासी मिळावेत म्हणून रिक्षा थांबा सोडून स्थानक प्रवेशद्वार, रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करून असतात, अशा रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिले आहेत.