Rare Sykes Nightjar bird spotted in Dombivli: डोंबिवली पश्चिमेतील कोपर गणेशघाट परिसरात खूप दुर्मिळ अशा ”सायक्स रातवा” पक्ष्याचे डोंबिवलीतील दोन पक्षीनिरीक्षकांना दर्शन घडले आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात या पक्ष्याची यापूर्वीची ऐतिहासिक नोंद १९१५ मधील आहे. तब्बल १११ वर्षांनी या दुर्मिळ प्रजातीचे पुन्हा डोंबिवली परिसरात दर्शन झाल्याने पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जैवविविधता आणि पक्षीवैज्ञानिक अभ्यासाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण नोंद मानली जात आहे. डोंबिवली देवीचापाडा सातपूल परिसरात गुरूवारी पक्षी निरीक्षण करण्यासाठी सकाळी साडे आठ वेळेत पक्षी निरीक्षक प्रशांत भगत, मिलिंद गणात्रा आपले कॅमेरे सोबत घेऊन गेले होते. नियमित पक्ष्यांबरोबर दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन आणि त्यांच्या प्रतिमा टिपणे हा या दोन्ही पक्षी निरीक्षकांचा उद्देश होता. सातपूल भागात उंच गवत, रानझुडपे असल्याने भगत आणि गणात्रा कोपर येथील गणेशघाट परिसरात भ्रमंतीसाठी आले.
कोपर गणेशघाट परिसरात पक्षी निरीक्षक भगत, गणात्रा गवत, जंगली झुडपांमध्ये फिरून विदेशी, दुर्मिळ पक्षी दिसतात का याचा शोध घेत होते. दोघांपासून पाच फुटांच्या अंतरावर झाडाच्या तोडलेल्या बुंध्यासारखा दिसणारा जमिनीवर बसलेला एक पक्षी अचानक उडाला. जवळच्या रानगवतात जाऊन लपला. हा पक्षी टिटवीसदृश किंवा स्नाइप असावा, असा अंदाज दोघांना आला. त्याच्या उडण्याच्या विशिष्ट पद्धतीवरून तो सायक्स रातवा असण्याची शक्यता या पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केली.
उत्कंठा वाढली
डोंबिवली परिसरात सायक्स रातवा असण्याची शक्यता नव्हती. या पक्ष्याचा भगत, गणात्रांनी रानगवत, झुडपांमध्ये शोध घेतला. तो आढळला नाही. तो एका संरक्षित बंगल्याच्या आतील भागात मुडपून बसला होता. त्याच्या पासून सुरक्षित अंतर राखून दोघांनी त्याची छायाचित्रे काढली. लाजाळू, सावध स्वभावामुळे हा पक्षी सहज नजरेस पडत नव्हता. हा पक्षी दुर्मिळ ”सायक्स रातवा” असावा, असा प्राथमिक अंदाज प्रशांत भगत, गणात्रा यांनी काढला. या पक्ष्याचे अचूक छायाचित्र काढण्यात दोघांना यश आले. त्याची तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक, ईबर्ड पक्षी ओळख संस्थेकडून ओळख पटविण्यात आली. तो सायक्स रातवा असल्याचे शिक्कामोर्तब झाले. डोंबिवलीतील या प्रजातीची ही पहिलीच नोंद असल्याचे ज्येष्ठ पक्षी निरीक्षकांनी सांगितले.
सायक्स रातवा आकाराने लहान आहे. त्याचा रंग फिकट, गवत, मातीशी मिळणारा, झाडाच्या तोडलेल्या खोडासारखा असतो. पक्षी भाषेत याला ”छद्मावरण” म्हणतात. रात्री सक्रिय असणारा हा पक्षी दिवसा गवतामध्ये अधिवास करतो.
ऐतिहासिक नोंद
ऑक्टोबर १९१५ मध्ये कल्याण परिसरात सायक्स रातवा या प्रजातीच्या एका मादीचा नमुना पक्षी निरीक्षकांनी संकलित केला होता. हा नमुना मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत जतन करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशात या पक्ष्याची खात्रीशीर नोंद अनेक दशकांपर्यंत झाली नसल्याचे पक्षी निरीक्षकांना आढळले आहे. जानेवारी २०१९ मध्ये भांडुप पंपिंग स्टेशन परिसरात या पक्ष्याचे दर्शन घडल्याची नोंद आहे. आता डोंबिवलीतील कोपर गणेशघाट परिसरात त्याचे दर्शन झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील या दुर्मिळ पक्ष्याच्या अस्तित्वाबाबत पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
महाराष्ट्रात दुर्मिळ
महाराष्ट्रात भारतीय रातवा, सवाना रातवा या प्रजाती आढळतात. सायक्स रातव्याचा अधिवास वायव्य भारत, पाकिस्तान आणि गुजरातमधील वाळवंटी प्रदेशात आहे. शहराच्या गजबजलेल्या परिसरात गवताळ भागांमध्ये दुर्मिळ पक्ष्यांचे अस्तित्व टिकून असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. डोंबिवलीच्या जैवविविधतेच्या अभ्यासासाठी ही नोंद महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे पक्षनिरीक्षक प्रशांत भगत यांनी सांगितले.
जंगल हा प्राणी, पक्ष्यांचा अधिवास. जंगलाची तत्वे पाळून आवड म्हणून पक्षी निरीक्षण करा. निसर्गाचा सन्मान राखत तेथील जैवविविधतेला कोणताही धोका न लावता आपण जंगलात पक्षी निरीक्षणाचा प्रयत्न केला तर नक्की ते तुम्हाला दर्शन देतात. पक्षी निरीक्षण करताना उथळपणा नको. यासाठी संयम खूप महत्वाचा आहे.-प्रशांत भगत पक्षी निरीक्षक, डोंबिवली.
