डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या पाच जणांच्या अड्ड्यांवर छापा टाकून दारू अड्डे उध्दवस्त केले आहेत. तसेच या दारू अड्डा चालकांच्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. अशाच पध्दतीने विष्णुनगर पोलिसांनी देवीचापाडा येथील सत्यवान चौकाजवळील हनुमान मंदिराजवळील भोईर सदन संकुलाजवळील नागरी वस्तीत नकली विदेशी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील रहिवासी करत आहेत.

गेल्या वर्षी विष्णुनगर पोलिसांनी दोन वेळा या दारू अड्ड्यावर छापा मारून संबंधितावर कायदेशीर कारवाई केली होती. एवढी कारवाई होऊनही संबंधित दारू अड्डा चालक पोलिसांना दाद देत नसल्याने पोलीस उपायुक्तांनी याप्रकरणात लक्ष घालून संबंधितावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मच्छिंद्र चिमण पाटील उर्फ मच्छ्या असे हा नकली विदेशी दारूचा अड्डा चालविणाऱ्या मालकाचे नाव आहे.

मच्छ्या यांचा अड्डा दिवस, रात्र चोवीस तास सुरू असतो. कष्टकरी, मजूर, नेपाळी रखवालदार आणि शहराच्या विविध भागातील व्यसनी या दारू अड्ड्यावर येतात. या अड्ड्यावर नकली विदेशी दारू विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत. कमी किमतीत या अड्ड्यावर विदेश दारू मिळत असल्याने व्यसनींचा या दारू अड्ड्याकडे अधिक ओढा आहे. या अड्ड्यावर दारू प्यायल्यानंतर अनेक जण याठिकाणीच भांडणे, हाणामाऱ्या करतात. या भागात घाण, कचरा करतात. त्याचा त्रास या भागातील रहिवाशांना होतो.

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी आपल्या पोलीस पथकासह अचानक या अड्ड्यावर छापा टाकून तेथील नकली विदेशी दारूसह दारू अड्डा चालकावर कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. हा अड्डाच आपले उपजीविकेचे साधन आहे अशाप्रकारचा देखावा उभा करून हा दारू अड्डा चालक पोलिसांना कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, परिसरातील रहिवाशांच्या वाढत्या तक्रारी विचारातून घेऊन आणि पोलिसांच्या कारवायांनाही हा दारू अड्डा चालक किमत देत नसल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मच्छिंंद्र पाटील यांच्या अड्डयावर कारवाई झाली की काही दिवस ते घराच्या परिसरात दारू साठा करून मग घरात दारू अड्डा चालू न ठेवता ग्राहकांना प्लास्टिक पिशवीत दारू विक्री करून घर परिसरात अड्डा चालू नाही असा देखावा उभा करतात.

विष्णुनगर पोलिसांनी महिनाभरात कोपर भागातील हेंद्रया चौकातील व्यंकटेश कदम, मोठागाव स्वामी नारायण सिटीजवळील कृष्णा डोलारे, कुंभारखाणपाडा भागातील आनंद मोरे, यशवंतनगर मधील परीक्षित बावकर, माणकोली पुलाजवळील राजकुमार चौहाण या हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या मालकांविरूध्द कारवाई करून त्यांचे दारू अड्डे उध्वस्त केले आहेत. अशाच पध्दतीने मच्छिंद्र पाटील यांचाही अड्डा कायमस्वरुपी उध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळेत या भागात दारू पिण्यासाठी येणाऱ्या व्यक्ति भांडण करून शांततेचा भंग करत आहेत.