डोंबिवली – कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या डोंबिवलीतील एका रिक्षा चालकाच्या मुलीच्या बँक खात्यात दोन कोटी ६० लाख रूपयांची रक्कम अज्ञात व्यवहारांमधून जमा झाल्याने या तरूणीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे.
विशेष म्हणजे या तरूणीच्या नावे विविध बँकांमध्ये काढण्यात आलेली बँक खाती सायबर गुन्हेगारी नावाने यंत्रणांनी बंद केली आहेत. आपण या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असताना हे परस्पर व्यवहार आपल्या बँक खात्यात झाल्याने या तरूणीने स्वताहून सायबर पोलीस, रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.
या तरूणीला तपास यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि याप्रकरणाचा निष्पक्षपाती तपास व्हावा यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. पोलीस याप्रकरणात सहकार्य करत नसल्याचा तरूणीचा आक्षेप असल्याने मनसेचे नेते जाधव यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकणात तरूणीने बदलापूर, उल्हासनगर येथील अशा एकूण तीन जणांवर या फसवणूक प्रकरणी संशय व्यक्त केला आहे.
उत्तराखंडमधील काही लोकांना फसवून माझ्या बँक खात्याचा वापर करीत २ कोटी ६० लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले आहेत. याची तक्रार करुन देखील पोलिस गंभीर दखल घेत नाहीत. आता या प्रकणात मी काय करू, असा प्रश्न डोंबिवलीतील विद्यार्थीनी निधी तिवारी हीने उपस्थित केला आहे.
फसवणुकीचा प्रकार
डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी परिसरात निधी तिवारी ही विद्यार्थिनी कुटुंबियांसह राहते. कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण आहे. ती एका खासगी बँकेत नोकरीला आहे. तिने निधीचे बँक खाते उघडले. यासाठी तिने निधीला काही पैसे दिले. मला बँक खाते उघडण्याचे लक्ष दिले आहे असे तिने तक्रारदाराला सांगितला. नंतर निधीच्या बँक खात्याचा परस्पर वापर झाला. त्या खात्यात २ कोटी ६० लाख रुपयांचे व्यवहार झाले. इतर बँकांमध्ये आपल्या नावे खाती उघडल्याचे तिच्या निदर्शनास आले. एका खात्यामध्ये दहा लाखापेक्षा अधिक रुपयांचे व्यवहार झाले. या प्रकरणी निधीने आपल्या मैत्रिणीकडे विचारणा केली. तिने उत्तरे टाळाटाळ केली. याविषयी काही होत नाही, असे ती सांगत होती. निधी हीने विविध बँक खात्यात चौकशी केली तेव्ही तिला माहिती पडले की, उत्तराखंडातील नागरीकांची फसवणूक करुन ते पैसे निधीच्या बँक खात्यात जमा केले आहेत.
मागील तीन महिन्यांपासून निधी याप्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. मनसेचे नेते जाधव म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सायबर क्राईम रोखण्यासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. तरी पोलिस दाद देत नाहीत. हे आश्चर्यकारक आहे. रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश जवादवाड यांनी सांगितले, या प्रकरणात तरुणीचा अर्ज आला आहे. चौकशी सुरु आहे.

