Dombivli Auto Fare Hike Demand: महागाईने प्रत्येकाचे जगणे हैराण करून ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशी सर्व परिस्थिती असताना रिक्षा प्रवासाच्या भाड्यात फक्त १ रुपया वाढ करण्याची घोषणा सरकारने केली आहे. ही रिक्षा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची चेष्टा आहे, अशा शब्दात या रिक्षा भाडेवाढी बद्दल डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काॅम्रेड काळू कोमास्कर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आणि ही भाडे सरसकट ३० रूपये करा. अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.
महागाई भरमसाठ वाढत असताना मागील दोन वर्षात रिक्षा भाडे वाढ फक्त एक रूपया करण्यात आली. या एक रूपयात रिक्षा चालक, मालकाने करायचे काय, असा प्रश्न अध्यक्ष काॅ. कोमास्कर यांनी केला आहे. १ सप्टेंबर पासून किमान रिक्षाभाडे २६ रूपयां ऐवजी २७ रुपये होणार आहे. रिक्षा चालकांना २ वर्षानंतर ही १ रुपयाची भाडेवाढ मिळणार आहे. ही भाडेवाढ म्हणजे शासनाने रिक्षा चालकांची निव्वळ चेष्टा केली आहे. रिक्षा मीटरमध्ये २६ रूपयांऐवजी २७ रुपये बदल करायला एक हजार ते दीड हजार रूपये खर्च येणार आहे. शिवाय रिक्षा दोन ते चार तास बंद ठेवावी लागणार आहे. तो तोटा रिक्षा चालकाला भोगावा लागणार आहे, असे कोमास्कर यांनी सांगितले.
नवीन रिक्षेची किमत तीन लाखापर्यंत गेली आहे. या रिक्षेच्या सुट्ट्या भागांच्या किंमती तीन ते चार पटीने वाढल्या आहेत. एका टायरचे पंक्चर २० रुपयांवरून ७० रुपये झाले आहे. सीएनजी बाटला पासिंग ५०० रुपयावरून तीन हजार रुपये झाले आहे. रिक्षा परवाना शुल्क ५०० ऐवजी १५ हजार ५०० रूपये झाले आहे. रस्ता कर, विमा व सर्वच सरकारी शुल्क मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असे कोमास्कर यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली शहरातील रस्ते बाराही महिने खड्डेमय असतात. पावसाळ्यात तर रस्त्यांवर चंद्रावरील खड्डे दिसू लागतात. या खड्डयांमुळे रिक्षांचे सर्वाधिक नुकसान होते. हा सर्व खर्च प्रवासी भाड्यातून मिळालेल्या पैशातून रिक्षा चालकाला करावा लागतो. याशिवाय रिक्षावरील कर्जाचे हप्ते, घरखर्च, मुलांचे शिक्षण अशा व्यापात रिक्षा चालक असतो. याचा कोणीही विचार करत नसल्याबद्दल काळू कोमास्कर यांनी नाराजी व्यक्त केली.
महागाई निर्देशांक नुसार दरवर्षी १ मे रोजी रिक्षा, टॅक्सीचे सुधारित दर घोषित करावे, असे शासनाने नेमलेल्या हकीम समिती व खटुआ समितीच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी देखील दिलेली आहे. परंतु,२०१४ पासून समितीच्या या अहवालांची अमलबजावणी शासनाने केली नाही. २०१४ पासुनच्या महागाई निर्देशांकानुसार रिक्षा भाडेवाढ दिली तर किमान रिक्षा भाडेवाढ ४० ते ५० रुपये होवू शकते. राज्याच्या परिवहन विभागाने वाढत्या महागाईचा विचार करून रिक्षाची किमान भाडेवाढ ३० रुपये करावी, अशी मागणी, लालबावटा रिक्षा युनियनचे डोंबिवलीतील काॅम्रेड काळू कोमास्कर यांनी शासनाकडे केली आहे.
