डोंबिवली : डोंबिवली जवळ दावडी, पिसवली जवळील पिंगारा बार जवळ दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन वाहन चालकांना तरूणांच्या गटाने बेदम मारहाण केली. या प्रकरणातील रिक्षा चालकावर चॉपरने, तर उबर मोटार चालकावर दगड, विटांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. या दोन्ही घटनाप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीतील माहितीनुसार, डोंबिवली पूर्व शेलार नाका भागातील इंदिरानगर झोपडपट्टी भागात विकास खरात (३०) हे रिक्षा चालक कुटुंबीयांसह राहतात. ते डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक ते दावडी गाव अशी रिक्षातून प्रवासी वाहतूक करतात. रविवारी सायंकाळी साडे सात वाजता ते रिक्षेतून दावडी येथे प्रवासी सोडण्यास गेले. तेथून परतत असताना त्यांना दावडी येथे सागर्ली येथे राहणारा त्यांचा मित्र अरविंद वानखेडे यांना इंदिरानगर झोपडपट्टी भागात राहणारे इमलेश जयस्वाल, शुभम जयस्वाल मारहाण करत होते असे रिक्षा चालक खरात यांना दिसले.

दोन्ही गटातील तरूण ओळखीचे असल्याने रिक्षा चालक विकास खरात त्या दोघांमधील भांडण मिटविण्यासाठी मध्ये पडले. जयस्वाल बंधूंनी विकास खरात यांना आमचा हा खासगी विषय आहे. तू या भांडणात पडू नको, असे बोलून इमलेश जयस्वाल याने त्याच्या कमरेचा चाॅपर काढून विकास खरात यांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. विकास यांना वाचविण्यासाठी अरविंद पुढे आले तर त्यांना शुभम याने पकडून ठेवले. विकास खरात रक्तस्त्रावामुळे जमिनीवर कोसळताच दोघे मारेकरी पळून गेले. विकास यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात शुभम, इमलेश जयस्वाल यांच्या विरुध्द तक्रार केली आहे.

दुसऱ्या एका घटनेत, मलंगगड रस्ता भागात राहणारे दीपक ठाकुर हे उबर मोटार चालक आहेत. मलंगगड रस्ता भागातील फिफ्टी फिफ्टी ढाबा ते रुणवाल गार्डन पर्यंत त्यांना एक प्रवासी भाडे मिळाले. एक महिला रात्री दहा वाजता प्रवास करत होती. या महिलेला घेऊन ते रूणवाल गार्डन गृहसंकुल दिशेने जात असताना शिळफाटा रस्त्यावरील पिसवली जवळील पाईप लाईन रस्त्यावरील पिंगारा बार येथे ठाकुर यांची मोटार बंद पडली.

ठाकुर यांनी महिला प्रवाशाला झाल्या प्रवासाचे पैसे द्या. दुसऱ्या वाहनाने रुणवालपर्यंत जा असे सांगितले. त्यावेळी त्या भागात उभा असलेला एक पांढऱ्या वेशातील इसम ठाकुर यांच्याजवळ आला. त्याने मोटारीतील महिलेला जाण्यास सांगितले आणि आम्ही काय ते बघतो, असा इशारा केला. ती प्रवासी महिला पैसे न देताच निघून गेल्यावर इसमाने आपल्या तीन सहकाऱ्यांना बोलावून उबर चालकाची काही चूक नसताना लाथाबुक्के, शिवागीळ करत बेदम मारहाण केली. ठाकुर यांच्यावर दगड, विटांचा मारा करून चार जणांनी गंभीर जखमी केले. ठाकुर यांना वाचविण्यासाठी इतर लोक पुढे आल्यानंतर मारेकरी पळून गेले.