डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर भागातील धर्मादाय पध्दतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रय ट्रस्ट रूग्णालयात रोटरी ग्लोबलच्या निधीतून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्या पुढाकाराने नेत्ररोग विभाग, भूल या विभागांसाठी लाखो रूपयांची अत्याधुनिक पध्दतीची वैद्यकीय सेवा सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली.
आश्रय ट्रस्ट रुग्णालयात येणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांमधील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या विचारातून ही सयंत्र या रूग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या अध्यक्षा स्नेहल शिंदे यांनी दिली.या वैद्यकीय सुविधेचे उद्घाटन जिल्हा प्रांतापाल हर्ष मकोल यांच्या उपस्थितीत आणि विविध मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले.
मागील अनेक वर्षापासून आश्रय ट्रस्ट रुग्णालयातर्फे गोरगरीब, गरजू, दुर्बल घटक, आदिवासी दुर्गम भागातील रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक रुग्णांना दुर्धर आजार असतात पण घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे ही रुग्ण आणि नातेवाईक मंडळी जवळील स्थानिक रुग्णालयात मिळेल ते उपचार करून आजार बरा करण्याचा प्रयत्न करतात.
या दुर्धर आजारासाठी खासगी किंवा इतर ठिकाणी मोठा खर्च येतो. त्यामुळे काही रुग्ण वैद्यकीय उपचार करून न घेता घरीच राहणे पसंत करतात.या सर्व परिस्थितीचा आश्रय ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. अरूण पाटील यांनी मागील पन्नास वर्षात अभ्यास केला. त्यांनी आश्रय ट्रस्ट रुग्णालयाच्या माध्यमातून शहापूर, वाडा, कसारा परिसरातील आदिवासी, दुर्गम डोंगर भागात राहत असलेल्या गाव, पाड्यांवर जाऊन अनेक वर्ष रुग्ण सेवा केली.
यामधील अनेक रुग्ण दुर्धर आजाराचे आढळले. ते अधिकच्या खर्चापोटी वैद्यकीय उपचार करून घेत नसल्याचे डाॅ. पाटील यांच्या निदर्शनास आले. डाॅ. पाटील यांनी डोंबिवलीतील आश्रय ट्रस्ट रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व स्तरातील रुग्णांबरोबर आदिवासी, दुर्गम, गरीब रुग्णांना उच्चतम दर्जाची वैद्यकीय सुविधा माफक दरात उपलब्ध झाली पाहिजे या उद्देशातून आश्रय ट्रस्टमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
आश्रय ट्रस्टमध्ये डोळ्यांच्या विकाराच्या अनेक शस्त्रक्रिया, उपचार केले जातात. या उपचारांना अत्याधुनिक पध्दतीची जोड मिळावी म्हणून आश्रय ट्रस्टमधील नेत्र विभागासाठी रोटरी ग्लोबल निधी अत्याधुनिक पध्दतीची सयंंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच, भूल विभागासाठीही अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली.
अधिकाधिक गोरगरीब, दुर्गम भागातील रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळेल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे अध्यक्षा स्नेहल शिंदे यांनी सांगितले.या वैद्यकीय उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्लोबल निधीचे संचालक बी. व्ही. रविशंकर यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या प्रकल्पाच्या उभारणीत रोटेरियन मनोज कुलकर्णी, स्नेहा तायशेटे, डाॅ. शिराळी यांनी महत्वाचे योगदान दिले.
आश्रय ट्रस्ट रुग्णालयाला अत्याधुनिक पध्दतीची यंत्रणा उपलब्ध करून दिल्याबद्दल आश्रय ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. पाटील, सचिव एन. आर. हेगडे यांनी रोटरी ग्लोबल, रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीचे पदाधिकारी, सदस्य, विश्वस्त यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अमेरिका टेक्सास येथील रोटरी क्लब ऑफ लुईसव्हिल, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई पाम बिच, सेंटाॅर फार्मास्युटिकल्सय यांचे मार्गदर्शन या उपक्रमाला मिळाले.
