डोंबिवली – डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक आपल्या विशेष पथकासह येऊन रेल्वे स्थानक भागात रिक्षा वाहनतळ सोडून रस्ते, चौक, वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने रिक्षा उभ्या करणाऱ्या सुमारे ५० हून अधिक रिक्षा चालक, ओमनी वाहनांवर कारवाई केली. आरटीओचे कारवाई पथक डोंबिवलीत अचानक दाखल होताच, अनेक रिक्षा चालक कारवाईच्या भीतीने पळून गेले.

डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रस्ते, चौक अडवून, प्रवाशांची अडवणूक करून प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे काही प्रवाशांनी केल्या होत्या. अनेक ओमनी वाहने शिळफाटा दिशेने आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून प्रवासी वाहतूक करत असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची गंभीर दखल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी घेऊन साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भाग्यश्री आवार, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक भावना पाटील यांना सोमवारी संध्याकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकासह शहराच्या इतर भागात कारवाईसाठी पाठविले.

आरटीओचे कारवाई पथक डोंबिवली रेल्वे स्थानक भागात आले. यावेळी अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी उभे होते. काही रिक्षा चालकांच्या रिक्षा वाहतुकीला अडथळा येईल अशा पध्दतीने रस्ते, चौक, रेल्वे स्थानक समोरील प्रवेशव्दारांसमोर उभ्या केल्या होत्या. या सर्व बेशिस्त रिक्षा चालकांना पळून जाण्याची कोणतीही संधी न देता आरटीओच्या कारवाई पथकाने त्यांना घेरले. त्यांच्यांवर ई चलान माध्यमातून दंडात्मक कारवाई केली.

या कारवाईच्यावेळी रिक्षा चालकांजवळील परवाना, परमिट, बॅज या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. अनेक रिक्षा चालकांजवळ ही कागदपत्रे आढळून आली नाहीत. काही रिक्षा चालक गणवेशात प्रवासी वाहतूक करत नव्हते. काही रिक्षा चालकांच्या रिक्षेत मोठ्या आवाजाची गाणी वाजविण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवली असल्याचे लक्षात आले. अशा सर्व रिक्षा चालकांवर आरटीओ पथकाने कारवाई केली. या कारवाईच्यावेळी काही रिक्षा चालकांवर यापूर्वीही बेशिस्त प्रकार कारवाई झाल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

ही कारवाई सुरू असताना या कारवाईच्या फेऱ्यात आपण सापडू नये म्हणून रिक्षा वाहनतळांवर उभे असलेले काही रिक्षा चालक गूपचुप प्रवासी न घेताच पळून गेले. कल्याण, डोंबिवली शहरात अनेक रिक्षा चालक भंगार रिक्षा (नल्ला) चालवित असल्याच्या तक्रारी आहेत. आरटीओ अधिकाऱ्यांनी दररोज कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागात कारवाई केली तर शहरातील भंगार, परवाना, परमिट, आयुर्मान संपलेल्या रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी चालक रस्त्यावर काढणार नाहीत, असे नागरिक सांगतात. डोंबिवली रेल्वे स्थानक भागात कारवाई केल्यानंतर पथकाने शहराच्या इतर भागात आपली कारवाई सुरू केली.

संध्याकाळच्या वेळेत नागरिक कामावरून घरी परतत असतात. या वेळेत काही रिक्षा चालक रेल्वे स्थानक भागातील प्रवेशव्दार,रस्ते, चौक अडवून नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात. यामुळे रिक्षा वाहनतळावर रिक्षा उभी करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर अन्याय होतो. प्रत्येक रिक्षा चालकाने वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कारवाया नियमित केल्या जाणार आहेत. – आशुतोष बारकुल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.