डोंबिवली : राज्याच्या परिवहन विभागाने रिक्षा चालकांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आदेश स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने कल्याण, डोंबिवली शहरात विविध भागात जाऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. दोन दिवसापूर्वी डोंबिवलीत राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य, बेशिस्तीने रिक्षा चालविणाऱ्या एकूण २० रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
अशाप्रकारच्या तपासणी मोहिमेत पुन्हा आपण आढळलात तर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून आपला परवाना निलंबित करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी तंबी यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागातील तपासणी अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना दिली. कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोश बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षकांचे पथक डोंबिवलीत रेल्वे स्थानक भागात दाखल झाले. त्यांनी रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळ, चौक, रस्त्यांवर उभ्या असलेल्या रिक्षा चालकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली.
यावेळी अने्क रिक्षा चालक गणवेशात नव्हते. काही रिक्षा चालकांचे रिक्षेची आवश्यक कागदपत्रे, नामपट्टी, प्रवासी सुविधेसाठी रिक्षेत करावयाच्या सुविधा नव्हत्या. अशा रिक्षा चालकांना आरटीओ अधिकाऱ्यांनी रोखून धरले. या रिक्षा चालकांनी तपासणी आरटीओ अधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन स्वताची या कारवाईतून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पण मोटार वाहन निरीक्षकांनी या सर्व रिक्षा चालकांना आवश्यक दंड भरा मगच तुमची सुटका केली जाईल. अन्यथा रिक्षा आरटीओ कार्यालयात जमा करून दंड भरल्यानंतर रिक्षा मुक्त करण्याची सूचना केली.
नियमबाह्यपणे, बेशिस्तीने हे रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर तपासणी अधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्व, पश्चिमेत आणि इतर चौक, रस्त्यांवरील एकूण २० रिक्षा चालकांवर दोन हजार रूपये ते चार हजार रूपये दंडाची कारवाई केली. अशाप्रकारे पुन्हा कागदपत्रे जवळ न बाळगता रिक्षेने प्रवासी वाहतूक केली तर दंडात्मक कारवाई बरोबर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना दिला.
आरटीओ अधिकारी डोंबिवलीत रिक्षा तपासणी आल्याचे समजताच अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळांवरून, रस्ते, चौकातून आपल्या घरी, आडमार्गाला निघून गेले. कल्याण डोंबिवलीत अनेक रिक्षा चालकांकडे कागदपत्रे नसताना ते रिक्षा चालवत असल्याचे समजते. कल्याण, डोंबिवली शहर परिसरात ही तपासणी मोहीम नियमित सुरू राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी सांगितले.
