डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानक भागात अनेक रिक्षा चालक नियमबाह्यपणे, जवळ रिक्षा परवान्याची कोणतीही कागदपत्रे नसताना प्रवासी वाहतूक करतात, अशा तक्रारी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कल्याण कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आणि डोंबिवली वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी संयुक्तपणे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर तपासणी मोहीम राबवून पन्नासहून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई केली.
कल्याण, डोंबिवली शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षा चालकांकडे रिक्षा चालविण्याचे परवाने नाहीत. काहींच्या रिक्षांचे आयुर्मान संपून त्या भंगार झाल्या आहेत. तरीही हे रिक्षा चालक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकारी यांची नजर चुकवून प्रवासी वाहतूक करत आहेत. हे रिक्षा चालक रिक्षा वाहनतळांवर न थांबता रेल्वेची प्रवेशव्दारे, मुख्य वर्दळीचे रस्ते, चौकांमध्ये थांबवून प्रवासी वाहतूक करतात. यामुळे रिक्षा वाहनतळांवर उभे राहून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर अन्याय होतो.
गेल्या दोन दिवसापूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, डोंबिवली वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी संयुक्तपणे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर अचानक रिक्षा आणि इतर वाहने तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. या कारवाई मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक प्रशांत सूर्यवंशी, मोटार वाहन निरीक्षक भाग्यश्री आवार, साहाय्यक आव्हाड, डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनसोडे आणि सहकारी सहभागी झाले.
या कारवाई पथकाने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, डाॅ. राॅथ रस्ता, रामनगर रिक्षा वाहनतळ, पाटकर रस्ता, फडके रस्ता, मानपाडा रस्ता, टिळक चौक, शेलार चौक, पश्चिमेत पंडित दिनदयाळ चौक, महात्मा गांधी रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता, ठाकुर्ली, कोपर उड्डाण पूल भागात अचानक रिक्षा तपासणी मोहीम राबविली. यावेळी अनेक रिक्षा चालक गणवेशात नव्हते. काही चालकांकडे रिक्षेची कागदपत्रे नव्हती. काहींची विमा, प्रदूषण नियंत्रणाची कालमर्यादा संपली होती असे आढळले. या सर्व रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ५० हून अधिक रिक्षा चालक सापडले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करून पुन्हा अशी बेशिस्तीची कृती केली तर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल करण्याची तंबी यावेळी संबंधित रिक्षा चालकांना देण्यात आली.
