डोंबिवली : डोंबिवली पूर्व मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील कौशल रेसिडेन्सी या इमारतीच्या एका सदनिकेत गुरुवारी छताच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. या वेळी बालिकेच्या बाजूला स्लॅब कोसळल्याने ती थोडक्यात बचावली. गेल्या महिनाभरात कौशल रेसिडेन्सी इमारतीत अशाप्रकारची घडलेली ही दुसरी घटना आहे, अशी माहिती याप्रकरणी पालिका आयुक्त आणि ‘ई’ प्रभागात तक्रार करणारे जयेश म्हात्रे यांनी दिली.

कौशल रेसिडेन्सी इमारत मोहन ए ग्रुपचे मोहनलाल चौधरी यांनी २०१८ मध्ये आमच्या मालकीच्या जमिनीवर नोंदणीकृत मिळकत विकास करार करून उभारली आहे. आमचे वडील हिरामण म्हात्रे यांच्याशी विकासक चौधरी यांनी कागदोपत्री व्यवहार केला होता. परंतु, चौधरी यांनी बनावट बांधकाम मंजुऱ्या, नकाशे व कागदपत्रांचा आधार घेऊन ही सात मजली इमारत निकृष्ट बांधकाम साहित्याच्या आधारे उभारली आहे.

२०२२ मध्ये ही इमारत पूर्ण झाली. यात सुमारे पाच विंग असून त्यातील सुमारे १०० हून अधिक सदनिका आहेत. यातील काही कुटुंबियांसोबत विकासकाने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन दस्त नोंदणी केली आहे. वडिलांचे निधन झाल्याने पालिकेकडून या इमारतीला काढण्यात येणारी नोटीस ही महापालिका अधिनियमाने विकासक मोहनलाल चौधरी यांच्या नावे काढण्यात यावी, असे असे जयेश हिरामण म्हात्रे यांनी पालिका आयुक्त, ई प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

स्लॅब कोसळला

गुरुवारी कौशल रेसिडेन्सीमधील एका सदनिकेतील छताचा स्लॅब अचानक कोसळल्याने त्या सदनिकेतील कुटुंंब घाबरले. भाग कोसळल्याच्या बाजूला बालिका बसली होती. या प्रकाराने इमारतीत घबराट पसरली. या इमारतीतील पाच सदनिकांमध्ये गेल्या महिन्यात असाच प्रकार घडला होता. हे बांधकाम अतिशय निकृष्ट पद्धतीचे असल्याने या इमारतीतील अनेक सदनिकांना तडे गेले आहेत. अनेक रहिवासी दस्तनोंदणी न करता घराचा ताबा घेऊन निवासासाठी आले आहेत. त्यांचे विकासकाशी व्यवहार झाले आहेत. त्यामुळे याविषयी उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले. पालिकेने ही इमारत अनधिकृत म्हणून घोषित केली आहे. या इमारतीला विकासक चौधरी यांनी ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम मंजुरीचे कागदपत्र वापरले आहेत. ही कागदपत्रे आतापर्यंत बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

विकासक तुरुंगात

सागाव येथील यशवंत पार्कमधील एका रहिवाशाची फसवणूक केल्याने गेल्या महिन्यात मोहनलाल चौधरी यांच्यासह इतरांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात मोहनलाल चौधरी अटकेत असून न्यायालयीन आदेशानुसार त्यांची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे. त्यामुळे राधाई, यशवंत पार्क नंतर आता कौशल रेसिडेन्सी इमारतीचा विषय तापणार असल्याची चिन्हे आहेत.