डोंबिवली : डोंबिवली पश्चिम माणकोली पुलाजवळील मोठागाव रेतीबंदर भागात महसूल विभागाच्या डोंबिवली विभागाने सलग दोन दिवस कारवाई करून खाडीतून बेकायदा रेती उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या ३१ लाख रूपये किमतीच्या क्रेन तोडून टाकल्या. या क्रेनच्या सांगाड्यांचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून त्याचे सांगाडे जप्त, तर काही भाग खाडीत ढकलून देण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.

महसूल विभागाने सलग दोन दिवस कारवाई करून वाळू माफियांना लक्ष्य केले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या महसूल हद्दीतील बेकायदा रेती उपसा करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या आदेशाप्रमाणे कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, नायब तहसीलदार पंजाबराव पवार, डोंबिवलीचे मंडळ अधिकारी रवींंद्र जमदरे, ठाकुर्लीचे मंडळ अधिकारी खेडकर, प्रीती घुडे, पष्टे आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्या पथकाने अचानक मोठागाव रेतीबंदर खाडी किनारी धाड मारली. यावेळी पोलीस बंदोबस्त सोबत होता. या बेकायदा रेती उपशाप्रकरणी मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे यांनी अज्ञात वाळू माफियांविरूध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जमीन महसूल अधिनियमाने गुन्हा दाखल करून घेतला आहे.

क्रेनची तोडमोड

मोठागाव रेतीबंदर खाडी किनारी रेती उपशाच्या एकूण आठ क्रेन उभ्या होत्या. रेती साठा करण्यासाठी २० हौद खाडी किनारा भागात बांधण्यात आले होते. रात्रभर उपसा केलेली रेती या हौदात एकत्रित करून मग वाळू माफिया ही रेती विक्रीसाठी नेत होते. महसूल विभागाच्या कारवाई पथकाने पोकलनेच्या साहाय्याने पहिले खाडी किनारच्या रेती उपशाच्या क्रेनची तोडमोड केली. या क्रेनचे अवजड सुटे भाग चुरा करून ते खाडीत ढकलण्यात आले. तर काही पाणी प्रदूषित होणार नाही याचा विचार करून या क्रेनची इंधन टाकी आणि इतर भाग जप्त करून ते भंगार तळावर नेण्यात आले. या क्रेन आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणारी यंत्रणा अशी एकूण ३० लाख ५० हजार रूपयांची ही सामग्री होती. ही सर्व सामग्री नष्ट करण्यात आली.

रेती हौदातील ५० हून अधिक ब्रास असलेली रेती जेसीबीच्या साहाय्याने खाडीत ढकलण्यात आली. वाळू माफियांनी खाडी किनारी येण्यासाठी डम्पर येण्यासाठी रस्ते तयार केले होते. ते पोकलेनच्या साहाय्याने उखडून टाकून माफियांची कोणत्याही प्रकारची वाहने खाडी किनारी येणार नाहीत अशा पध्दतीने कारवाई करण्यात आली.

या सलग दोन दिवसांच्या कारवाईने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाळू माफियांविरूध्द एकाचवेळी कळवा, दिवा, मुंब्रा, डोंबिवली, भिवंडी, टिटवाळा परिसरात कारवाई सुरू असल्याने वाळू माफियांची दाणादाण उडाली आहे.