डोंबिवली : डोंबिवलीच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकास प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. नाट्यगृहाच्या उर्वरित कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी ३० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याने नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी एकूण ४५ कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या उर्वरित कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

डोंबिवलीला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे मोठे योगदान राहिले आहे. अनेक वर्षे नाट्यप्रयोग, संगीत मैफली, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व साहित्यिक उपक्रमांचे हे महत्त्वाचे केंद्र होते. मात्र, नाट्यगृहाची इमारत जीर्ण झाल्याने ते बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था व रसिकांची मोठी गैरसोय होत होती. कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी या कामासाठी वाढीव निधी मिळावा यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. अखेर राज्याच्या नगरविकास विभागाने या नाट्यगृहाच्या उर्वरीत कामांसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या खर्चाचा संपूर्ण १०० टक्के हिस्सा राज्य शासन उचलणार असून, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका या कामाची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे पुनर्विकासाच्या उर्वरित कामांसाठी निधीची तरतूद झाली आहे.

नव्या स्वरूपातील नाट्यगृह

-अत्याधुनिक सांस्कृतिक केंद्र म्हणून नाट्यगृहात भव्य रंगमंच, उत्तम आसनव्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना व आकर्षक रंगसंगतीसह नाट्यप्रयोगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईल.

-छोटेखानी नाट्यप्रयोगांसाठी स्वतंत्र ड्रामा थिएटर, कलाकारांच्या सरावासाठी सराव कक्ष व कलाविष्कारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी स्वतंत्र आर्ट गॅलरी उभारण्यात येईल.

-नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीसोबतच बाह्य परिसराची कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाट्यप्रेमी, कलाकार आणि रसिकांसाठी एक सर्वसमावेशक, आधुनिक आणि दर्जेदार सांस्कृतिक केंद्र डोंबिवलीत साकार होईल.