डोंबिवली – मतदार यादी पडताळणीचा कार्यक्रम शासनाकडून जाहीर झाला आहे. राष्ट्रीय कार्यक्रमाचा हा एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली पालिका शाळांमधील शिक्षकांना या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम सुरू आहे. दहावीच्या, शाळेतील उत्तरपत्रिका तपासणीची कामे करण्यात वेळ जात असल्याने कल्याण डोंबिवलीतील अनेक शाळांमधील शिक्षकांनी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील एका नामवंत शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमात सहभागी होण्यास नकार दिल्याने पालिकेच्या ग प्रभाग अधिकाऱ्यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात त्या शाळेच्या १६ शिक्षकांविरूध्द तक्रार केली आहे.

तक्रार दाखल शिक्षकांमध्ये १४ शिक्षिका आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील स्थानिक महापालिका, नगरपालिकांनी आपले कर्मचारी, पालिका हद्दीतील शिक्षक यांच्या साहाय्याने हा मतदार यादी पडताळणीचा कार्यक्रम पार पाडायचा आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशावरून प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी आपल्या हद्दीतील शाळांमधील अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लेखी आदेश काढले आहेत.

नामवंत शाळा

हे आदेश अनेक शिक्षकांनी स्वीकारण्यास नकार दिला. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात एक नामवंत जुनी शाळा आहे. या शाळेतील १६ शिक्षकांना ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून सहभागी होण्यास कळविले होते. या शाळेतील १६ शिक्षकांनी पालिकेचा आदेश स्वीकारण्यास नकार दिला. तसेच निरोप देऊनही या उपक्रमात सहभागी झाले नाहीत. काहींनी हा आदेश स्वीकारला पण ते आदेश स्वीकारूनही मतदार यादी पडताळणी कार्यक्रम सहभागी झाले नाहीत.

या शिक्षकांच्या काम न करण्याच्या भूमिकेमुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे साहाय्यक आयुक्त पवार यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२ प्रमाणे साहाय्यक नोंदणी अधिकारी म्हणून आपण ही १६ शिक्षकांविरूध्द तक्रार करत आहोत, असे तक्रारदार पालिका अधिकाऱ्याने रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

अशा प्रकारची शिक्षकांविरूध्द दाखल झालेली ही तिसरी तक्रार आहे. यापूर्वी दत्तनगरमधील एका नामवंत शाळा, मानपाडा रस्त्यावरील एका नामवंत शाळेतील अशा एकूण १० शिक्षकांविरूध्द अशाच प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल आहे.

शाळा चालक त्रस्त

शिक्षकांनी शिकवायचे काम करायचे आहे. शाळांना आपला दर्जा टिकवण्यासाठी शिक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतात. अनेक शाळांचे शिक्षक शाळेतील, दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात व्यस्त आहेत. तीन महिन्यापूर्वीच कल्याण, डोंबिवलीतील शिक्षकांनी पालिका नि़वडणुकीसाठी दोन महिने कामे केली. आता मतदार यादी पडताळणी, त्यानंतर जनगणना या कामांसाठी शिक्षकांना का जुंपले जात आहे. यासाठी शासनाने वेगळी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी शिक्षण संस्था चालकांनी केली आहे.

बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. अशा मंडळींना या कामासाठी घेऊन शासन निवडणुका, मतदार यादी पडताळणी, जनगणनेचे काम करून घेऊ शकते. या माध्यमांतून बेरोजगारांना काम मिळेल. शाळांना सुट्टी लागल्यानंतर अनेक शिक्षक वर्षभरात एकदा आपल्या मुळ गावी जातात. त्यांचे नियोजन या कामांमुळे बिघडले आहे, असे त्रस्त शिक्षण संस्था चालकांनी सांगितले.