Dombivli Crime News: घराबाहेर चप्पल स्टॅन्ड ठेवण्यावरून एका ६२ वर्षाच्या गृहस्थाला ४५ वर्षांच्या व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी डोंबिवलीत घडली. या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. मणिलाल सतरा असे मारहाण झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या शेजारी राहणारे मनोजकुमार सिंग (४५) यांच्याविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरासमोर चप्पल ठेवल्यामुळे जाण्या-येण्यास त्रास होतो. तसेच तुमची लहान मुले घराबाहेर ओरडा करतात, असे प्रश्न करीत सिंग यांनी मणिलाल यांना बेदम मारहाण केली.

मणिलाल हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील एका गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घरासमोरील कोपऱ्यात चप्पल ठेवण्याच एक स्टॅन्ड आहे. गुरुवारी रात्री घराबाहेर मोठ्याने ओरडत इथे चप्पल स्टॅन्ड ठेऊ नका. आम्हाला जाण्या येण्यास त्रास होतो. असे कोणीतरी मोठ्याने बोलत होते. घराबाहेर कोण बोलतय म्हणून तक्रारदार मणिलाल दरवाजात गेले.

त्यावेळी सिंग यांनीसतरा यांना पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही चप्पल ठेवण्याचा स्टॅन्ड घराबाहेर का ठेवता. आम्हाला जाण्या येण्यास त्रास होतो. तसेच, तुमची मुले घराबाहेर ओरडा करतात त्याचाही त्रास होतो. चप्पल स्टॅन्ड एका बाजुला आहे. त्यामुळे त्याचा त्रास होण्याचा प्रश्न नाही. मुले लहान आहेत ती घराबाहेर खेळणारच असे तक्रारदार मणिलाल यांनी सिंग यांना सांगताच मनोजकुमार सिंग सतरा यांच्या अंगावर धावून आले. सिंग यांनी अरेरावी बोलत धक्काबुक्की करत सतरा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सतरा यांच्या बोटांना दुखापत झाली.

त्यानंतर सतरा यांना ढकलल्याने ते घरासमोरील मोकळ्या जागेत पडले. आपण बाहेर पडल्याचे समजताच आपल्या सुनेने आपणास हाताला धरून घरात आणले. आपण पोलिसांच्या सूचनेवरून पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी गेलो. तेथील डाॅक्टरांचा तपासणी अहवाल आल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलो आहोत. आपल्या करंगळीला गंभीर दुखापत झाली आहे, असे सतरा यांनी तक्रारीत म्हटले आहे.