डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळील नेहरू मैदान भागात राहत असलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली. आपल्या मुलीच्या घरी पायी जात असताना सुमारे एक लाख २० रूपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन भुरट्या चोरट्यांनी खेचून पळ काढला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागात भुरट्या चोऱ्या वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हे भुरटे चोर ज्येष्ठ नागरिक विशेषत: महिलांना लक्ष्य करतात. अशीच एक घटना डोंबिवलीतील स्टार काॅलनी परिसरात घडली. रंजना किलारी (६२) गेल्या आठवड्यात दुपारच्या वेळेत तक्रारदार नेहरू मैदान परिसरातील एका गृहसंकुलात आपल्या मुलीकडे जात असताना अचानक आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले.
हा प्रकार सुरू असताना एकाने या भुरट्या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. ३० वर्ष वयोगटातील हे भुरटे चोर होते. डोंबिवली शहराजवळील झोपडपट्टीत हे चोरटे राहतात. त्यांना लपण्यासाठी, पळून जाण्यासाठी योग्य मार्ग असल्याने ते डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील नेहरू मैदान, सावरकर रस्ता भागात चोऱ्या करतात, असे स्थानिकांनी सांगितले.
