डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर गावमधील माजी नगरसेवक संजय पावशे हे धान्य वाटप करत आहेत. आम्ही तुम्हाला तेथे धान्य मिळवून देतो सांगून या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किमतीची सोन्याची साखळी जवळील पिशवीत गुंडाळून ठेवतो असे दाखवून दोन्ही भामट्यांनी या महिलेची दिशाभूल करून महिलेची सोन्याची साखळी लबाडीने काढुन घेऊन पलायन केले आहे.
विष्णुनगर पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी कोपर गावमधील जनाबाई निवासमागील सुकऱ्या धोंडू म्हात्रे चाळीत राहणाऱ्या सुनंदा एकनाथ म्हात्रे (६५) यांनी दोन अज्ञातांविरूध्द तक्रार केली आहे. सुनंदा यांनी तक्रारीत म्हटले आहे, की सकाळच्या वेळेत आपण कोपर गावमध्ये भाजी खरेदीसाठी गेले होते. भाजी खरेदी करून पायी घरी परतत होते. संजिवनी दवाखान्याजवळ आल्यावर आपणास पाठीमागून कोणीतरी हाक मारली. म्हणून आपण थांबलो. त्यावेळी दोन इसम आपल्या जवळ आले.
त्यांनी आपणास सांगितले, माजी नगरसेवक संजय पावशे हे धान्य वाटप करत आहेत. आपण तुम्हाला धान्य मिळवून देतो, असे सांगून ते सुनंदा म्हात्रे यांना घेऊन सुकऱ्या म्हात्रे चौकातील इंद्रायणी इमारतीच्या प्रवेशव्दारावरजवळ आले. तेथे त्यांनी आपणास बोलण्यात गुंतवून गळ्यातील सोन्याची साखळी जवळील बटव्यात ठेवण्यास सांगितली. आपण ती बटव्यात ठेवली. आपणास डोक्यावर पदर घेऊन तेथे बसण्यास सांगितले. ते दोन इसम आम्ही तात्काळ परत येतो सांगून तेथून निघून गेले.
थोड्या वेळाने सुनंदा यांची परिचित छाया म्हात्रे या तेथून जात होत्या. त्यांनी सुनंदा यांना आपण येथे काय करता असे विचारले. त्यावेळी याठिकाणी धान्य वाटप होणार आहे म्हणून वाट पाहत बसले आहे, असे सांगितले.हा प्रकार ऐकून छाया यांना धक्का बसला. त्यांनी सुनंदा यांना याठिकाणी धान्यवाटप वगैरे काहीही नाही. असे सांगून तुम्हाला कोणीतरी फसवले आहे.
हे ऐकून सुनंदा म्हात्रे यांनी गळ्यातून काढून बटव्यातील प्लास्टिक पिशवीत ठेवलेली ७० हजार रूपयांची सोनसाखळी तपासली. त्यावेळी बट्व्यात काही आढळले नाही. त्यामुळे आपणास दोन्ही भामट्यांनी लबाडीने, हातचलाखी करून फसविले असल्याचे सुनंदा यांच्या निदर्शनास आले. या फसवणूक प्रकरणी सुनंदा म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
