डोंबिवली – डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे बुधवारी मध्यरात्री हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. शेखर जोशी यांनी ‘सकाळ’ वृत्तसमुहात अनेक वर्ष पत्रकारिता केली. ‘सकाळ’चे डोंबिवली विभागाचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर ते ‘लोकसत्ता’ वृत्तपत्रसमुहात दाखल झाले.
‘लोकसत्ता’मध्ये साहित्यिक, सांस्कृतिक बीट ते सांभाळत होते. विविध ठिकाणी होणारी अखिल भारतीय साहित्य संमेलने, नाट्य संमेलने यांचे वार्तांकन त्यांनी केले. सामाजिक, नागरी समस्यांवर ते सडेतोड लिखाण करत होते. कल्याण, डोंबिवलीतील रिक्षा प्रवाशांना मीटरप्रमाणे प्रवास करता यावा यासाठी परिवहन विभागाने कल्याण डोंबिवली शहरांमध्ये रिक्षा चालकांसाठी सक्तीने मीटर योजना राबवावी यासाठी ते मागील २५ वर्ष बातम्यांच्या माध्यमातून शासनस्तरावर लढा देत होते. त्यांच्या वृत्तांची दखल घेऊन परिवहन विभागाने कल्याण डोंबिवलीत मीटरप्रमाणे रिक्षा वाहतुकीला काही वर्षापूर्वी सुरूवात केली होती.
डोंबिवली, कल्याण शहरातील वाहन कोंडी, रिक्षा वाहनतळ, फेरीवाल्यांनी गजबजलेले रेल्वे स्थानक परिसर या विषयावर ते सातत्याने लिखाण करत होते. शहरातील नागरी समस्या सोडविण्यात आमदार, खासदार आणि नगरसेवकांकडून होणारी चालढकल याविषयी ते आपल्या लिखाणातून तीव्र भावना व्यक्त करून राजकीय मंडळींवर टीकेचे आसूड ओढत असत.
‘लोकसत्ता’मधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर शेखर जोशी यांनी ‘शेजो’ या नावाने समाज माध्यमांतून लिखाण सुरू केले होते. या माध्यमातून कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक नागरी समस्या ते सतत मांडत असत. विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या नामवंत व्यक्ती, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक प्रकारच्या कलागुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना ते आपल्या लिखाणातून प्रसिध्दी देत होते. नियमित चालणे, योग, चौकटबध्द राहणीमान, सडेतोड बोलणे असा त्यांचा व्यवहार होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला.
