डोंबिवली – मागील दोन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात रिक्षा, दुचाकी वाहने चोरणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील एका २५ वर्षाच्या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीची रिक्षा, दुचाकी असा एकूण सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी दिली.
आदर्श रोहिदास बागडे (२५) असे चोरट्याचे नाव आहे. तो कुंभारखाणपाडा सरोवरनगर भागात राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आदर्श बागडे याने उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे, अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे केले आहेत, असे पोलीस तपासातून उघड झाले आहे. कुंभारखाणपाडा भागातील सरोवरनगर रागाई टर्फजवळील साई मंत्र चाळीत विनायक तटकरे राहतात.
ते रिक्षा चालक म्हणून व्यवसाय करतात. ते घराच्या परिसरात आपली रिक्षा उभी करतात. गेल्या मे महिन्यात आपल्या घराच्या जवळील पिंपळेश्वर चाळीजवळ तटकरे रात्रीच्या वेळेत नेहमी रिक्षा उभी करून ठेवत असत. गेल्या मे महिन्यात सकाळी ते प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा काढण्यासाठी घराजवळ गेले तर त्यांना रिक्षा आढळुन आली नाही. त्यांनी घर परिसरात शोध घेतला.
रिक्षा मिळून न आल्याने विनायक तटकरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या तपास पथकाने या रिक्षा चोरीचा शोध सुरू केला. या तपासात तटकरे यांची रिक्षा कुंभारखाणपाडा भागात राहत असलेल्या आदर्श रोहिदास बागडे याने चोरी असल्याची पक्की माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या दिशेने तपास करून बागडे याला अटक केली.
बागडे याची सखोल चौकशी केल्यावर त्याने उल्हासनगर येथील दीपिका निकलेख मेंघानी यांची दुचाकी चोरली असल्याचे उघड झाले. अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच, उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत बागडे याने आणखी एक वाहन चोरले असल्याची कबुली पोलिसांना दिली.
तक्रारदार दीपिका मेंघानी उल्हासनगर ३ ओटी सेक्शन शिवमंदिर परिसरात आपल्या कुटुंबीयासह राहतात. त्या आदित्य बिर्ला इन्शुरन्स कंपनीत नोकरी करतात. गेल्या एप्रिल महिन्यात त्या आपल्या आईला घेऊन रात्रीच्या वेळेत केबी रस्त्याने अंबरनाथ दिशेने जात होत्या. यावेळी जीओ पेट्रोलपंपाजवळील आगरी तडका हाॅटेलजवळ दीपिका यांची दुचाकी बंद पडली.
दुचाकी सुरूच होत नसल्याने त्यांनी आगरी तडका हाॅटेलजवळ दुचाकी उभी करून ठेवली. त्या घरी आल्या. दुसऱ्या दिवशी त्या भावाला घेऊन दुचाकी सुरू करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना दुचाकी आढळुन आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला दुचाकी मिळून न आल्याने चोरट्याने ती चोरली असल्याचा संशय घेऊन त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
अशाच पध्दतीने उल्हासनगरमध्य आदर्शने वाहनाची चोरी केली आहे, असे पोलीस तपासात उघड झालेल आहे. या दोन्ही चोऱ्या आदर्शने केल्या आहेत. आदर्श हा सराईत वाहन चोर असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. बागडेवर यापूर्वी ठाण्यातील नौपाडा, कोपरी, विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बागडेने आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.
