Dombivli Shambhavi Sanjay Gharat ISC 12th Topper: येथील एमआयडीसी भागातील ओंकार महाविद्यालयाची आय. एस. सी. बोर्डाची १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी शांभवी संजय घरत हिने या बोर्डाच्या १२ वी परीक्षेत ९७ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. गुरूवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ओंकार शाळेचे इतर विद्यार्थी चमकले आहेत.
यामध्ये निशिता सिंग हिने ९४.५० टक्के, अबन रखांगीने ९३.२५ टक्के गुण मिळवले आहेत. शांभवी घरत हिला या परीक्षेतील काही विषयांमध्ये सर्वात्कृष्ट गुणांचा मान मिळाला आहे. दहावीच्या परीक्षेत शांभवीने याच शाळेतून आयसीएसई बोर्डातून ९८.४ टक्के गुण मिळवून गुणवत्तेत येण्याचा मान मिळवला होता.
प्रखर ग्रहणशक्ती असलेल्या शांभवीला शालेय जीवनापासून चित्रकला, संकल्पचित्रचा (डिझायनिंग) छंद आहे. वेगवान माहिती तंत्रज्ञानामुळे पाॅडकास्टचा आशय (कन्टेंट) तयार करण्याची तिला आवड आहे. अभ्यासक्रमाबरोबर तिने हे छंद जोपासले आहेत. स्वसामर्थ्याने आपल्या नियोजनबध्द वेळेतून तिने अभ्यास केला. पहिल्यापासून अभ्यासात सातत्य ठेवले. आई, वडिलांचे नियमित पाठबळ मिळाले. वडील संजय घरत गुणवंत इंजिनीअर आणि कल्याण डोंबिवली पालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. त्यामुळे क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर वैविध्यपूर्ण माहिती मिळणे सोपे झाले, असे शांभवीने सांगितले.
हे छंद जोपासत असताना आपणास बॅडमिंटनची आवड आहे. आपला स्क्रिनटाईम अत्यंत कमी असून तो फक्त अभ्यासपुरता वापरते. एकदा वाचले की पुन्हा मला पु्न्हा त्यासाठी मागे जाण्याची गरज वाटत नाही. अभ्यासाचे काटेकोरपणे नियोजन करून मन लावून अभ्यास केला. हे करत असताना आई, वडील, ओंकार महाविद्यालयाच्या प्राचार्या अर्चना परूळेकर आणि शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे त्याची पावती उच्च गुणातून आपणास मिळाली, असे शांभवीने स्पष्ट केले.
अर्थविषयक विषयांत आपणास गोडी आहे. इनव्हेस्टमेंंट बँकर हा आपल्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे येत्या काळात आपणास सनदी लेखापाल व्हायचे आहे. त्याच बरोबर सनदी अधिकारी पदाचा विचार करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. इंडियन इन्स्टिटुयट ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण घ्यायचे आहे. जागतिक स्तरावरील उच्च शिक्षणाचा विचार करून आपण सिंगापूर येथील नॅशनल युनिर्व्हिसिटी, लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स या विदेशातील सर्वाेच्च स्थानी असलेल्या अर्थविषयक मार्गदर्शनाच्या संस्थांमधून शिक्षण घेणार आहोत. अर्थविषयक जागतिक स्तरावरील धोरणात्मक निर्णय यामध्ये आपणास काम करण्यास आवडेल, असे शांभवी घरत हिने सांगितले.
ओंकार महाविद्यालयाने डोंबिवलीत प्रथमच मागील शैक्षणिक वर्षापासून आयएससी उपक्रमाची सुरूवात केली. त्यातून हे महाविद्यालयाला राज्यस्तरावर घवघवीत यश प्राप्त झाले आहे.
(शांभवी संजय घरत)
