कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डाॅक्टरांना नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी रात्रीच्या वेळेत येऊन बेदम मारहाण केली. डाॅक्टर, परिचारिकांना धमक्या देऊन अरेरावीची भाषा केली. याप्रकरणी डाॅक्टरच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या दाखल गुन्ह्यानुसार, त्यामधील भारतीय न्याय संहितेच्या कलमाप्रमाणे या गुन्ह्याचा तपास करून रमेश म्हात्रेंची कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती चौकशी करून आरोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल केले जाईल आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर दिली.

पोलीस यंत्रणा कोणत्याही दबावाखाली न येता याप्रकरणाचा तपास करत आहे. आवश्यक त्या कायद्याशीर बाबींचा आधार घेऊन म्हात्रे यांना आमच्या ताब्यात असताना कोणतीही सहज सुलभता त्यांना मिळेल यासाठी कोणतेही प्रयत्न केले जाणार नाहीत.

आरोपी म्हणुनच आम्ही त्यांच्याकडे पाहत आहोत. ते वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते रुग्णालयात असल्याने त्यांची जबाबदारी रुग्णालय प्रशासनावर असते. अशाप्रसंगी घाईत पोलिसांनी त्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि आरोपी रुग्णाच्या जीविताला काही धोका उद्भवल्यास पेच उभा राहू शकतो. त्यामुळे या द्विधा परिस्थितीत आरोपी रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असेल तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहत नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारदार डाॅक्टरने केलेल्या तक्रारीप्रमाणे नगरसेवक म्हात्रे यांच्यावर आवश्यक ती मारहाण, धमक्या, सामुहिक कटाचा भाग, शिवीगाळ यासह वैद्यकीय कायद्याप्रमाणे गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी पालिका प्रशासन किंवा तक्रारदार डाॅक्टरांकडून कलमे वाढविण्यासंदर्भात काही सूचना आल्या तर त्याची शहानिशा करून संबंधित तक्रारदार डाॅक्टर यांच्याशी चर्चा करून ती कलमे वाढविण्याबाबत विचार केला जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.

या सर्व प्रकरणात आरोपी असलेल्या नगरसेवकाला सहज सुलभता मिळेल यादृष्टीने पोलीस प्रशासन कोणतेही प्रयत्न करणार नाही. तसा कोणताही दबाव आमच्यावर नाही, कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय न्याय संहितेच्या नवीन कायद्यानुसार पोलीस अटक आरोपीच्या पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडी मागू शकतात. कारण त्यामुळे वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या आरोपीच्या जीवितास धोका उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहत नाही, असे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

न्यायालयात आमच्या मागणीप्रमाणे आरोपी नगरसेवकाला पोलीस कोठडी मिळाली तर आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे त्यांची चौकशी करणार आहोत. त्या चौकशीत समाधानकारक माहिती मिळाली नाही तर त्यांची पोलीस कोठडी वाढविण्यासाठी पुन्हा आम्ही न्यायालयाकडे मागणी करू शकतो, असेही हा अधिकारी म्हणाला. पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे म्हात्रे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रमेश म्हात्रे यांच्यावर कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्वतंत्र संस्थात्मक प्राथमिक तपासणी अहवाल नोंद करावा. तसेच,मारहाण झालेल्या डाॅक्टर महिलेने रमेश म्हात्रेंविरूध्द ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी खासगी डाॅक्टरांचा दबाव वाढत आहे. या डाॅक्टर मारहाण प्रकरणाची लोकल, एसटी बस, रिक्षा अशी जळीस्थळी जोरदार चर्चा आहे. एका मुजोर नगरसेवकामुळे अख्खी डोंबिवली बदनाम झाल्याने शहरातील नागरिक मात्र तीव्र संताप व्यक्त करत आहेत. मात्र, कोपर भागातील बहुतांशी नागरिक ‘आमच्या रमेश दादाने केले ते योग्यच केले’ अशी भूमिका घेऊन आहेत.