डोंबिवली: पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दोन डाॅक्टर आणि दोन परिचारिका यांना कर्तव्यावर असताना शिंदे शिवसेनेचे डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या दांडगट समर्थकांनी केलेल्या मारहाण प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी मंगळवारी रात्री म्हात्रे यांच्या तीन समर्थकांना अटक केली आहे.
नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांचे खासगी अंगरक्षक म्हणून मिरविणाऱ्या या दांडगट समर्थकांमधील रमेश लक्ष्मण पवार (५०, रा. वडारवाडी, डोंबिवली पूर्व), प्रकाश उर्फ प्रकाश उध्दव निकम (३५, रा. सुंदरा आई आर्केड, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम), अक्षय शरद कारंडे (३०, रा. कलम श्री सोसायटी, कोपर क्राॅस रोड, डोंबिवली पश्चिम) यांना पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रणाचे आधारे मंगळवारी रात्री उशिरा अटक केली आहे.
या प्रकरणातील मुख्य गुन्हा दाखल इसम नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना पोलिसांनी अटक न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मारहाणीच्या वेळी गरोदर महिलेसोबत आलेली नातेवाईक महिलाही डाॅ. सृष्टी बाविस्कर यांच्याशी कचाकचा, चढ्या आवाजाने बोलत वाद घालत होती. ही महिला या वादाचे मुख्य कारण असल्याने पोलिसांनी या महिलेला याप्रकरणात आरोपी केले आहे.
म्हात्रेंच्या अटकेसाठी आग्रह
कल्याण, डोंबिवली शहर परिसरासह राज्यातील विविध औषधोपचरांच्या डाॅक्टरांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील नवतरूण महिला, पुरूष डाॅक्टरांसोबत नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी केलेल्या गैरकृत्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाने स्वताहून पुढाकार घेऊन या नगरसेवकावर कठोर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रिया राज्यभरातील डाॅक्टर, जाणते नागरिक, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांकडून उमटत आहेत.
मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे मुख्य गुन्हा दाखल इसम आहेत. त्यामुळे त्यांना पोलीस का अटक करत नाहीत, असे प्रश्न डाॅक्टर संघटना, विविध स्तरातील जाणत्या नागरिकांकडून करण्यात येत आहेत. म्हात्रे यांना अटक करण्यात काही राजकीय दबाव असेल तर पोलिसांनी तसे जाहीर करावे, अशीही वैद्यकीय क्षेत्राची मागणी आहे.
सत्तेचा माज आला की अशा गैरकृत्य करण्याची खुमखुमी अशा नगरसेवकांना येते. एक सत्ताधारी शिवसेनेचा नगरसेवक पालिका रुग्णालयातील महिला डाॅक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना दांडगाई करत मारहाण करतो. यावर आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. याविषयी मुळचट भूमिका प्रशासनाने घेतली तर आयुक्त लोकांना काय न्याय देतील. त्यामुळे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक झालीच पाहिजे. अटक झाली नाहीतर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील.
- कांचन कुलकर्णी नगरसेविका, कल्याण.
