डोंबिवली – शिंदे गटाचे डोंबिवलीतील कोपर प्रभागाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचे नगरसेवक पद रद्द करण्याकडे शासकीय यंत्रणा गेल्या सात महिन्यांपासून दुर्लक्ष करत आहेत. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि म्हात्रे याचे नगरसेवक पद तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने बुधवारपासून (ता. २२ जुलै) मुंबईत आझाद मैदान येथे भर पावसात बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

रमेश म्हात्रे याच्या कोपर प्रभागात खाडी किनारचे कांदळवन नष्ट करून उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळींविषयी, म्हात्रे याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारदार कल्पेश गंगाराम जोशी तक्रारी करत आहेत. या तक्रारींची शासन यंत्रणा दखल घेत नसल्याने कल्पेश जोशी यांनी मुंबईत आझाद मैदानात भर पावसात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरसेवक रमेश म्हात्रे याचा थेट बेकायदा बांधकामांशी संबंध आला आहे. त्याने कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक काळात उमेदवारी अर्ज भरताना दिलेले सत्यप्रतिज्ञा पत्र खोटे आहे. म्हात्रे याने उमेदवारी अर्जात दिलेली माहिती खोटी आहे हे आपण सत्यप्रतिज्ञापत्राव्दारे राज्य निवडणूक आणि इतर शासन यंत्रणा कळविले आहे. तरीही आपल्या तक्रार अर्जाची शासन यंत्रणा दखल घेत नाहीत. रमेश म्हात्रे संदर्भातील आपले सत्यप्रतिज्ञापत्र खोटे असेल तर शासनाने आपल्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून तक्रारदार जोशी यांनी शासनाकडे केली आहे.

रमेश म्हात्रेने डोंबिवलीत पालिका रुग्णालयात डाॅक्टरांना केलेल्या मारहाण प्रकरणामुळे म्हात्रेचे मागील ३० वर्षातील अनेक कारनामे आता उघडकिला आले आहेत. या अनुषंगाने म्हात्रेवर कठोर कारवाई करण्यासाठी आणि त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आता पुढे सरसावल्या आहेत. एका डाॅक्टर महिलेवर रमेश म्हात्रेने हात उचलून तिला मारहाण केली. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि दमदाटी केली. परिचारिकांना अरेरावी केली. या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आणि म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी महाराष्ट्र स्त्री मुक्तीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले. डोंबिवली महिला महासंघ याविषयी आक्रमक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मारहाण प्रकरणात लक्ष घालून रमेश म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आता जोशी म्हात्रेच्या विरोधात आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसणार असल्याने म्हात्रेचे प्रकरण दाखल असलेल्या शासकीय विभागांचे धाबे दणाणले आहेत.

नगरसेवक रमेश म्हात्रेच्या कोपर प्रभागात कांदळवन नष्ट करून बेसुमार बेकायदा चाळी उभारल्या गेल्या आहेत. पालिका, महसूल अधिकारी स्थानिक पातळीवरील दहशतीमुळे तेथे कारवाई करू शकत नाहीत. म्हात्रेचा बेकायदा बांधकामाशी थेट संबंध आहे हे आपण सत्यप्रतिज्ञापत्रातून निवडणूक आयोगासह शासकीय विभागांना कळविले आहे. तरीही आपल्या तक्रारीची दखल शासन घेत नाही. म्हात्रेचे नगरसेवक पद रद्द करत नाही म्हणून आपण बेमुदत उपोषण करत आहोत. – कल्पेश जोशी उपोषणकर्ते