डोंबिवली – गेल्या वर्षीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर डोंबिवलीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे शीत युध्द जवळजवळ संपले होते. रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर भाजपने कितीही कुरघोड्या केल्या तरी त्याला प्रत्युत्तर देणे शिवसेना शिंदे गटाने थांबवले होते. त्यानंतर अनेक महिन्यांनी शिवसेना शिंदे गटाने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना डिवचणारे फलक मंगळवारी डोंबिवलील झळकावून भाजपची खोड काढण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

भाजपने डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे मुख्य म्होरके पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल करून घेतले. हा पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या अतिशय जिव्हारी लागला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नंतर समाज माध्यमांसह सर्व स्तरातून खिल्ली उडविण्यात आली. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी पक्ष वाढीसाठी जे काही करता येईल ते करा असे संदेश भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिल्याने भाजपचा पक्ष विस्ताराचा वारू चौफेर उधळला आहे.

ही सर्व फोडाफोडी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने होत असल्याने शिवसेना शिंदे गटाचा विशेषता खासदार डाॅ. शिंदे यांचा आणि समर्थकांचा रवींद्र चव्हाण यांच्यावर रोष आहे. महायुतीमुळे हा रोष उघडपणे व्यक्त करता येत नाही. त्यामुळे डोंबिवलीत विकास कामांच्या माध्यमातून शिवसेनेने रवींद्र चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी डोंबिवली शहरात दर रविवारी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि त्याच बरोबर पक्ष प्रवेश असा कार्यक्रम गेल्या दोन महिन्यांपासून हाती घेतला आहे. या पक्षप्रवेश आणि उद्घाटन सत्रामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेना शिंदे गटाने अलीकडे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मार्गी लागणाऱ्या ठाकुर्ली रखडलेल्या उड्डाण पुलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार डाॅ. शिंदे यांच्या पुढाकाराने ठाकुर्ली रेल्वे फाटक ते ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकापर्यंतच्या उन्नत मार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी एमएमआरडीएकडून ३६ कोटीचा निधी मिळविण्याची बाजी मारली आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

आमचा नेता फक्त राजकारण न करता लोकांच्या तक्रारी, नागरी समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य देतो. आम्ही फोडाफाडीला फार महत्व देत नाही, लोकांच्या समस्या आमच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत, असे फलकाच्या माध्यमातून दाखवून शिवसेना शिंदे गटाने ‘आमच फक्त काम बोलते, फोडाफोडीचे राजकारण आमच्या दृष्टीने नगण्य’, असे भाजपला विशेषता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

या फलकबाजीवरून शिवसेना शिंदे गटाने भाजपला अनेक महिन्यांनी डिवचले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांना शिवसेना शिंदे गटाने डिवचल्याने नंदू परब, दीपेश म्हात्रे, महेश पाटील, संदीप माळी असे एकापेक्षा एक खिलाडी भाजपकडे असल्याने आता भाजप शिवसेनेच्या फलकांना कशी उत्तर देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.