डोंबिवली – कल्याण डोंबिवली शहरांसाठी ठरलेला भाजप आणि शिंदे शिवसेनेतील युती धर्माचा अलिखित नियम शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोडल्याने, त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी रविवारी भाजपच्या कल्याण डोंबिवली शाखेने शिंदे शिवसेनेचे डोंबिवली पूर्वेतील २५ युवा कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल करून घेतले. अशाचप्रकारे शिंदे शिवसेनेसह, उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते येत्या काही दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत कांबळे यांनी सांगितले.

शिंदे शिवसेना आणि भाजपची कल्याण डोंबिवली पालिकेत युती आहे. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीपूर्वी भाजपने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेना, मनसे, ठाकरे गटातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला होता. भाजपच्या या पक्ष प्रवेश मोहिमेमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली होती. शिंदे शिवसेनेच्या वरिष्ठांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन भाजपच्या या स्थानिक पातळीवरील पक्ष प्रवेशाची थेट राज्य भाजप नेते आणि दिल्ली भाजप नेत्यांकडे तक्रार केली होती. यावरून भाजप, शिंदे शिवसेनेत तणाव वाढला होता.

भाजपला दमाने घेण्याचा सल्ला

या तक्रारीनंतर भाजपच्या वरिष्ठांनी भाजपच्या कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांना शिंदे शिवसेनेचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता आपल्या पक्षात घ्यायचा नाही. शिंदे गट भाजपमधील एकही पदाधिकारी, कार्यकर्ता त्यांच्या पक्षात दाखल करून घेणार नाही, असे दोन्ही पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये ठरले होते. या नियमामुळे पालिका निवडणुक काळातील भाजपने शिंदे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची मोहीम थांबवली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युती धर्माचा सल्ला दिल्लीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून मिळाल्याने शांततेची भूमिका घेतली होती.

शिवसेनेकडून कुरघोडी

युती धर्माचे पालन करत कल्याण डोंबिवलीतील शिंदे शिवसेना आणि भाजपमधील पक्षीय कार्यक्रम, पालिकेत युती म्हणून कारभार सुरू असताना, भाजपला अंधारात ठेऊन शिंदे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, आमदार राजेश मोरे यांनी भाजपच्या डोंबिवली, कल्याणमधील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. शिंदे शिवसेनेने युती धर्माचा करार मोडीत काढल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. शिंदे शिवसेनेने आमचा एक पदाधिकारी फोडला तर आम्ही त्यांचे दोन पदाधिकारी फोडू, असा इशारा भाजपने दिला होता.

२५ कार्यकर्ते भाजपमध्ये

रविवारी डोंबिवली पूर्व, कल्याण ग्रामीणमधील युवा कार्यकर्ते अर्चित खटकुळ यांच्यासह शिंदे शिवसेनेचे २५ युवा कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष नंदूू परब, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत कांबळे, विशू पेडणेकर, समीर चिटणीस, नगरसेवक आणि शिक्षण मंडळ सभापती अभिजीत थरवळ, रंजना पेणकर, महेश पाटील, शारदा चौधरी, मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेऊन हे कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले, असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले.

‘भाजपमध्ये विविध स्तरावर कामाची संधी, मान, सन्मान मिळतो म्हणून शिंदे शिवसेना, मनसे, ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तशी त्यांनी तयारी केली आहे. कासव संथगतीने चालतो, पण तोच जिंकतो. त्यामुळे आम्ही संयमाने हे पक्ष प्रवेश करून घेणार आहोत, असे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.

आम्ही कोणाला उत्तर देण्यासाठी पक्ष प्रवेश देत नाहीत. शत प्रतिशत भाजप वाढविण्यासाठी आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चालविलेल्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी, युवा शक्तीला चांगली कामाची संधी, सन्मान मिळावा म्हणून हे पक्ष प्रवेश केले जात आहेत. – शशिकांत कांबळे नगरसेवक, भाजप.