डोंबिवली – डोंबिवली शहरातील अरूंद रस्ते, त्यात वाढलेल्या वाहनांची भर, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा विचार करून कल्याण डोंबिवली शहरात सर्व प्रकारच्या सण, उत्सवांना मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर कमानी, दर्शनी भव्य शुभेच्छा फलक लावण्यास राजकीय पक्षांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी पालिका आयुक्त, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीचा गांभीर्याने विचार करून शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शहर परिसरातील आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने शहरात एकही शुभेच्छा कमान लावू नये, अशा सूचना केल्या आहेत.
मनसेच्या मागणीची शिंदे शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतल्याने शहरात या गाढ आणि गूढ मैत्रीची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे शिंदे शिवसेना, मनसेच्या उत्सवी शुभेच्छा कमानी शहरात दिसणार नाहीत. मागील चार वर्षात मनसे आणि शिंदे शिवसेनेच्या कल्याण डोंबिवलीतील स्थानिक नेत्यांमधून विस्तव जात नव्हता. ट्वीवटर, समाज माध्यमांमतून आपल्या शीर्षक पत्रातून मनसेचे कल्याण, डोंबिवली ग्रामीणचे नेते सातत्याने विकास कामे, नागरी समस्यांवरून शिंदे शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. शिंदे यांना लक्ष्य करत होते.
आता तीच मनसे आणि शिंदे शिवसेना कल्याण डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीनंतर गळ्यात गळे घालून सुखनैव, शहर विकासाचा, लोकांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून पावले टाकू लागल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि समाधानही व्यक्त केले जात आहे. भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकारी यांना लक्ष्य करण्यासाठी ही खेळी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपकडून फलकबाजी
मागील अनेक वर्ष भाजपकडून कल्याण डोंबिवली पालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊन, प्रस्तावित शुल्क भरून डोंबिवली शहराच्या विविध भागात उत्सवी शुभेच्छा कमानी उभारल्या जातात. या कमानी एकदा दहीहंडी उत्सवाच्या वेळी लावल्या की त्याच कमानी, शुभेच्छा फलकांवर मग गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन भाजप नेते, पदाधिकारी लोकांना पुढील तीन महिने आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कमानींचा वाहतुकीला मोठा अडसर ठरतात.
डोंबिवली शहरातील वाहन संख्या वाढली आहे. माणकोली उड्डाण पुलाचा वाहन चालक मधला मार्ग म्हणून वापर करून डोंबिवली शहरातून इच्छित ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहेत. या वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत डोंबिवली शहरातील उड्डाण पूल, रस्ते अरूंद आहेत. शहर आता दिवसेंदिवस वाहन कोंडीत अडकू लागले आहे. त्यात रस्त्याचा तीन ते साडे तीन फूट भाग अडवून ठेवणाऱ्या शुभेच्छा कमानी लावल्या की रस्त्यांवरून वाहन चालविणे वाहन चालकांना अवघड होते.
मागील अनेक वर्ष या शुभेच्छा कमानींचा त्रास डोंबिवली शहरातील नागरिक सहन करत आहेत. काही राजकीय मंडळींच्या कमानी आता शहरात झळकू लागल्या आहेत. त्याचा त्रास आता कोंडीच्या माध्यमातून नागरिकांना सुरू झाला आहे. यापूर्वी भाजपच्या कमानी शहरात लागल्या की त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे शिवसेनासह मनसे, ठाकर गटासह इतर पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या शुभेच्छा कमानी, फलक शहरात लावून वाहतुकीला अडथळा, शहराचे विद्रुपीकरण करत होते.
निर्णयाचे स्वागत
डोंबिवली शहरात यावेळी शिंदे शिवसेनेसह मनसेने स्वागत, शुभेच्छा कमानी न लावण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे शहरातील विविध संस्था, विविध स्तरातील जाणकार नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरात लाखो रूपये खर्च करून कमानी आणि फलक लावण्यापेक्षा राजकीय पक्षांनी डोंबिवली शहराच्या होत असलेल्या उकिरड्यावर प्रभावी उपाययोजना करून शहराचे रंगरूप आकर्षक होईल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
