डोंबिवली– निवडणुका, विविध प्रकारची आंदोलने यासाठी नेहमीच एकत्र येण्याचे डोंबिवलीतील शिवसेनेचे केंद्र स्थान म्हणजे डोंबिवलीतील श्रध्दानंद पथावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळील शिवसेना मध्यवर्ति शाखा. शिवसेनेचा कोणीही नेता, पदाधिकारी शाखेत येणार असला की शाखेत आणि बाहेरील रस्त्यावर शिवसैनिकांची गर्दी ओसंडून जायची. शिंदे यांच्या बंडखोरीने शाखेत उभे दोन गट पडल्याने गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदी घोषणा झाली तरी नेहमी गजबजणारी शिवसेना मध्यवर्ति शाखा शांत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाखेच्या रक्षणासाठी चार ते पाच पोलीस आणि कार्यालय कर्मचारी या व्यतिरिक्त कोणीही ज्येष्ठ शिवसैनिक शाखेत फिरकला नाही. या घटनेवरून निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक हे उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या डोंबिवलीतील बैठकीत उध्दव ठाकरे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. या बैठकीत उध्दव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला.

शिवसेना मध्यवर्ति शाखेतील एकनाथ शिंदे आणि खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी बंडखोरी केल्याने निष्ठावान शिवसैनिकांनी काढल्या. या घटनेवरून निष्ठावान उध्दव आणि शिंदे समर्थक गटात जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीच्या रागातून शिंदे समर्थक उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि त्यांच्या १५ पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी शिवसेना पक्ष पदाचे राजीनामे दिले. तसबिरी काढल्या त्यावेळी निष्ठावान शिंदे समर्थक काय करत होते, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आपण मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असलो तरी शिवसैनिकांनी शांत राहायचे. कोणच्याही आनंदात अडथळे आणायचे नाहीत असे स्पष्ट केल्याने, शिंदे यांच्या बंडखोरीमुळे संतप्त असलेला उध्दव समर्थक शिवसैनिक शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शांत असल्याचे गुरुवारी दिसले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli shiv sena central branch become silent after eknath shinde rebel zws
First published on: 30-06-2022 at 19:38 IST