डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रस्त्यावरील मोक्षधाम स्मशानभूमीची अत्याधुनिक पध्दतीने उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्मशानभूमीतील जुन्या पध्दतीची लाकडांनी पार्थिव दहन करण्याची स्मशानभूमी येत्या रविवार (ता.१५) पासून तोडण्याचे काम कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम विभागाच्या ठेकेदाराकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्मशानभूमीचे नव्या उभारणीचे काम पूर्ण होईपर्यंत शिवमंदिर स्मशानभूमी बंद राहणार आहे, असे डोंबिवलीचे पालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी सांगितले.

लाकडाने पार्थिव दहन करण्यात येणारी स्मशानभूमी बंद राहणार असली तरी या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनी मात्र सुरूच राहणार आहे, असे कार्यकारी अभियंता सांगळे यांनी स्पष्ट केले. शिवमंदिर स्मशानभूमी रविवारपासून दहनासाठी बंद राहणार असल्याने नागरिकांनी पार्थिव दहनासाठी डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा गणेशघाट भागातील स्मशानभूमी, डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली भागातील स्मशानभूमी, ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौक भागातील स्मशानभूमींचा वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

स्मशानभूमी दुरवस्था

डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रस्त्यावरील मोक्षधाम स्मशानभूमी ही डोंबिवली ग्रामपंचायत, नगरपालिका काळातील स्मशानभूमी आहे. डोंबिवली हे यापूर्वी गाव स्वरुपात होते. त्यामुळे गावाच्या बाहेर ही स्मशानभूमी होती. आता वस्ती वाढल्याने ही स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी आली आहे. या स्मशानभूमीत डोंबिवली शहरासह पलावा, शिळफाटा भागातून पार्थिव दहनासाठी आणली जातात. मागील सहा ते सात वर्षाच्या कालावधीत शिवमंदिर स्मशानभूमीची सर्वाधिक पडझड झाली. पावसाळ्यात पार्थिव मंचकावर दहन होत असताना पावसाचे पाणी पार्थिवावर पडण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. ही स्मशानभूमी सुस्थितीत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती.

अद्ययावत स्मशानभूमी

शिवमंदिर स्मशानभूमी ही शहराच्या मध्यवर्ति ठिकाणची स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी अद्ययावत पध्दतीने उभारण्याचा निर्णय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता अनिता परदेशी, डोंबिवली पालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी घेतला. स्मशानभूमी उभारणीचा सुस्थितीमधील आराखडा तयार करून तो वरिष्ठांना सादर केला. या प्रस्तावाला ऑक्टोबर २०२४ मध्ये पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. आता या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या स्मशानभूमीत दहन मंच, नागरिक आसन व्यवस्था, स्वच्छतागृह, निवारा, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था, लाकडांच्या वखारीसाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहनतळ अशा सुविधा असणार आहोत, असे कार्यकारी अभियता सांगळे यांनी सांगितले.

शिवमंदिर स्मशानभूमीतील जुना भाग तोडून तेथे नव्याने अद्ययावत पध्दतीने स्मशानभूमीची उभारणी करण्यात येणार आहे. हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत लाकडाने पार्थिव दहनाचा भाग बंद असेल. या स्मशानभूमीतील गॅस शहदाहिनी फक्त या कालावधीत सुरू असेल. हे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी शहरातील इतर स्मशानभूमींचा पार्थिव दहनासाठी उपयोग करावा. -मनोज सांगळे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.