डोंबिवली – डोंबिवली सागाव येथील मानपाडा रस्त्यावरील शिवसेना शाखेजवळ टायर विक्रीच्या गाळ्यात एक टोळी मद्य, अंमली पदार्थ सेवन करून पादचाऱ्यांना टोमणे मारत होते. याबाबत अनेक तक्रारी शिवसेना शाखेत येत होत्या. या टोळक्याने शाखेतील कार्यकर्त्याला व कुटुंबीयांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. रोजच्या त्रासामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त होते. अखेर शिवसैनिकांनी जाब विचारत या टोळक्यांना चोप दिल्याची माहिती शिंदे शिवसेनेचे सागाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांनी दिली.
या टोळक्याने दोन दिवसापूर्वी अश्लिल शब्द वापरून मानपाडा परिसरात वाद घातला होता. याची माहिती मानपाडा पोलिसांना देताच पोलिसांनी या टोळक्याला पोलीस ठाण्यात नेत समज दिली होती. या टोळक्यातील काही जण मद्य सेवन, काही जण गांजा इतर अंमली पदार्थ सेवन करून सागाव शिवसेना शाखेच्या बाजुला असलेल्या टायर दुकानाच्या समोर बसतात.
पादचाऱ्यांना टोमणे मारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार या टोळक्यांकडून सुरू होते. याबाबत अनेक तक्रारी येत असताना दोन दिवसांपूर्वी या टोळक्याने परीसरातील एकाला हटकले.
तसेच व्यक्तिगत पातळीवर शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यामुळे जाब विचारण्यासाठी गेलो असता मद्यसेवन केलेल्या काहींनी आमच्यावर हल्ला केला. यामुळे या टोळीला चोप दिल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. याप्रकाराबाबत सर्व माहिती आम्ही मानपाडा पोलिसांना यापूर्वीच दिली आहे. परंतु या टोळक्याला पोलिसांनी समज देऊन त्यांचे अरेरावी कमी झाली नाही. या टोळक्याचा लोकांना त्रास होता. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी आम्हाला समज द्यावी लागली, असे ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले. याबाबत आम्ही मानपाडा पोलीस, पोलीस उपायुक्त, साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्याकडे मांडणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.
