डोंबिवली – श्रावण महिन्यात केळीच्या पानाला विशेष महत्व असते. त्यामुळे या महिन्यात केळीच्या पानांची मागणी वाढते. यावेळी बाजारात केळीच्या पानांचा तुटवडा जाणवत असून उपलब्ध केळीचे एक पान ३० रूपयांना आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या महिलांकडून नागरिकांना विकले जाते. केळीच्या तीन पानांचे एक वेट्टोळे ६० रूपयांना विक्री केली जात आहे. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागातील बाजारात केळीची पाने दिसू लागली आहेत.
रानकेळी म्हणून प्रसिध्द असलेली ही पाने नागरिक श्रावण महिन्यात सण, उत्सव काळात भोजनासाठी वापरण्यास सर्वाधिक पसंती देतात. यापूर्वी कसारा, खर्डी, शहापूर माहुली किल्ला, कर्जत, नेरळ, बदलापूर, मलंगगड भागातील आदिवासी, डोंगराळ भागातील आदिवासी महिला आदल्या दिवशी रात्री कसारा, कर्जत, बदलापूर लोकलने डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक भागात येऊन मुक्काम करून सकाळपासून केळीची पाने विक्री करत असत. या पानांचे गठ्ठे रेल्वे स्थानकाजवळील जिने, बाजारातील दुकानांच्या कोपऱ्यांना उभे करून मागणीप्रमाणे ही केळीची पाने विक्री केली जात होते.
पानांचा तुटवडा
यावेळी बाजारात रानकेळीच्या पानांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. मोजक्याच आदिवासी महिला ही पाने घेऊन विक्रीसाठी बाजारात येत आहेत. डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील बाजीप्रभू चौक, चिमणीगल्ली, नेहरू रस्ता, फडके रस्ता, गुप्ते रस्ता, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, कल्याणमध्ये रेल्वे स्थानक भागातील बाजारात पानांची विक्री करतात. यापूर्वी केळीची पाने, आळुची पाने, रानभाज्या करटोली, घोळु, कोहळु, लोथ इतर पालेभाज्या घेऊन या महिला रांगेत बसत असत. पण आता हे प्रमाण खूप कमी झाले आहे.
कसारा भागातून आलेल्या भागाबाई वाख या महिलेने सांगितले, यंदा पाऊस उशिरा सुूरू झाला. त्यामुळे मे, जून महिन्यात रानकेळीची पाने उगवणीचा हंगाम लांबणीवर पडला. त्यानंतर जुलैमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाते उगवणीचे कोंब पावसाच्या माऱ्याने कुजले, सडले, गळून पडले. त्यामुळे यावेळी जंगलांमध्ये रानकेळीची पाने अधिक प्रमाणात फुलली नाहीत. यापूर्वी एकाच जागी रानकेळीच्या पानांची उगवण दिसून यायची. यावेळी रानकेळीची पाने शोधण्यासाठी दिवसभर जंगलात फिरावे लागते.
या कालावधीत जंगली डासांचा वाढता त्रास, बिबट्याची वाढलेली भीती त्यामुळे दुर्गम डोंगराळ भागात आदिवासी महिला जाण्याचे धाडस करत नाहीत. डोंगरांच्या समोरील भागात जेवढी रानकेळीची पाने दिसतात. तेवढी घेऊन आम्ही ही पाने घेऊन विक्रीसाठी येतो. ही पाने सहज मिळत नाहीत. त्यासाठी खूप मेहनत असते. यावेळी रानकेळीच्या पानांचे प्रमाण खूप कमी आहे. या तुटवड्यामुळे आणि वाढत्या मागणीमुळे रानकेळीच्या पानांचे दर वाढले आहेत. याशिवाय करटोली, घोळु, आळुची पाने या भाजाही उशिराने आलेल्या पावसामुळे त्यांचा उगवणीचा, फुलण्याचा हंगाम लांबणीवर पडला. त्यामुळे या रानभाज्याही बाजारात मुबलक प्रमाणात नाहीत, असे सावत्री भांगरे या महिलेने सांगितले.
